नगर परिषदांच्या निवडणुकीचा धुरळा खाली बसल्यानंतर आता जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. एका विवाहसोहळ्यात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या दोन्ही नेत्यांसोबत भाजप नेते आणि राज्याचे मंत्री आशिष शेलार देखील उपस्थित होते. जवळपास २० मिनिटे या नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीची चर्चा सुरू असताना आता दुसरीकडे राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर निघाले आहेत.
advertisement
राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, कारण काय?
राज्यातील राजकीय वातावरण तापलं असताना दुसरीकडे राज ठाकरे हे अचानक दिल्ली दौऱ्यावर असल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी दिल्लीकडे रवाना होत आहेत. त्यांच्या दिल्ली दौऱ्याचे कारण राजकीय नसून कौटुंबिक आहे.
राज यांची सून मिताली ठाकरे यांचे भाऊ डॉ. राहुल बोरुडे यांचे लग्न ५ डिसेंबर रोजी दिल्लीमध्ये पार पडणार आहे. या सोहळ्याला राज ठाकरे यांच्यासह ठाकरे परिवारातील जवळचे नातेवाईक उपस्थित राहणार आहेत.
राजकीय उपस्थितीचीही शक्यता
दिल्लीतील या विवाह सोहळ्याला अनेक राष्ट्रीय पातळीवरील राजकीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे हा कार्यक्रम राजकीय व्यक्तिमत्त्वांच्या अनौपचारिक भेटी–गाठींसाठीही एक महत्त्वाचा ठरू शकतो, अशी चर्चा रंगू लागली आहे.
दोन दिवसांचा मुक्काम
विवाहसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुढील दोन दिवस दिल्लीमध्ये थांबणार आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील राजकीय घडामोडींची तापलेली पार्श्वभूमी असतानाच त्यांचा हा दौरा उत्सुकता निर्माण करणारा ठरत आहे. राज ठाकरे ६ डिसेंबरपर्यंत मुंबईत परत येण्याची शक्यता आहे.
