मागील काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. आज बैठकीत राज यांनी पदाधिकार्यांना महत्त्वाचे आदेशही दिले.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज विभाग अध्यक्ष आणि काही शाखा अध्यक्षांची विशेष बैठक घेतली. या बैठकीत गटाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी विशेष जबाबदारी घेऊन निवडणुकीच्या कामाला लागावे, मतदार याद्या तपासाव्यात, अशा स्पष्ट सूचना राज ठाकरेंनी दिल्या. प्रत्येक वॉर्डमध्ये किमान 2 जणांना मतदारयादीची जबाबदारी द्या, 110 जणांची एक टीम तयार करून मतदार यादीचा आढावा घेण्याची सूचना राज यांनी दिली.
advertisement
बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आखणी करताना राज ठाकरे यांनी स्थानिक पातळीवर संघटन बळकट करण्यावर भर देण्याचे आवाहन केले. “आगामी निवडणुकीत मनसेची ताकद दाखवून द्या. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचा, शाखा-पातळीवर संघटन घट्ट करा,” असे सांगत त्यांनी नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले.
इतर कोणाचीही ताकद नाही, मनसेसोबत फक्त...
राज यांनी बैठकीत बोलताना सांगितले की, “मुंबईत तळागाळात खऱ्या अर्थाने फक्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याच कार्यकर्त्यांची ताकद आहे. बाकी पक्षांची इथे एवढी ताकद नसल्याचे वक्तव्य राज यांनी केले.
राज यांचे हे वक्तव्य विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. मनसे आणि ठाकरे गटाची युती झाल्यास त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.