तुमच्या कृतीतून महाराष्ट्राला नख लागतंय, हे ज्यावेळी आम्हाला समजेल, तेव्हा आम्ही अंगावरच येऊ, अशा भाषेत राज ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला. यावेळी आपण दुसऱ्यांदा शेकापच्या कार्यक्रमाला आल्याचं देखील त्यांनी सांगितलं. तसेच शेकापच्या जयंत पाटलांनी रायगड जिल्ह्याची जबाबदारी घ्यावी, असंही ते म्हणाले.
महाराष्ट्र सरकारकडून आयोजित केलेल्या गुजराती साहित्य संमेलनावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्र राज्य स्वत: गुजराती साहित्य संमेलन भरवतंय. त्यांना भरवू द्या. त्यांचं व्यापाऱ्यांच्या चोपड्यातून पुस्तकांच्या चोपड्यात लक्ष गेलं तर आणखी बरं. पण हे काय सुरू आहे. हे केवळ गुजराती माणसाबद्दल प्रेम नाही. तर मराठी माणूस आणि गुजराती माणसाची इथं लागावी, भांडणं व्हावीत. त्यातून आपण मतं कसे काढू शकतो. यासाठी काय काय करता येईल, यासाठीचे हे सर्व उद्योग आहेत. दुसरं काहीही नाहीये.
advertisement
त्यांना वाटलं होतं की यावर राज ठाकरे, संजय राऊत रिअॅक्ट होतील, पण आम्ही रिअॅक्ट होणार नाही. आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू. तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार नाही. बिलकुल करणार नाही. ज्यावेळी आम्हाला समजेल की तुमच्या कृतीतून महाराष्ट्राला नख लागतंय, त्यावेळी आम्ही अंगावरच येऊ. आज मी तुमच्यासमोर एवढ्यासाठीच आलोय. कान बंद ठेवू नका. डोळे बंद ठेवू नका. आजुबाजुला नक्की काय चालू आहे. याकडे तुमचं बारीक लक्ष असलं पाहिजे. तुम्ही विकले जातायत. तुमच्या पायाखालची जमीन निसटून जातेय. उद्या तुमची भाषा देखील निघून जाणार. मग कालांतराने पश्चातापाचा हात कपाळावर मारायची वेळ येईल. दुसरं काहीही तुमच्या हातात नसेल, असंही राज ठाकरे म्हणाले.