आगामी महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महानगरपालिकेवर कोणाची सत्ता असणार, याकडे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपकडून मुंबईचा महापौर हिंदू होणार असल्याचे वक्तव्य केल्यानंतर बीएमसी निवडणुकीत हिंदुत्व, हिंदू-मुस्लिम मुद्दा रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तर, दुसरीकडे विरोधकांकडून भाजप नेत्यांच्या या वक्तव्यावर टीका केली जात आहे.
advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय म्हणाले?
मुंबई महापालिका निवडणुकीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. मनसेकडून आयोजित कोकण महोत्सवात बोलताना त्यांनी सध्याच्या राजकीय हालचालींबाबत सावधगिरी बाळगण्याची सूचना करताना मनसैनिकांना गाफील न राहण्याची सूचना केली आहे.
राज ठाकरे म्हणाले की, “रात्र वैऱ्याची आहे… गाफील राहू नका.आजूबाजूला लक्ष ठेवा. मुंबईवर ज्या प्रकारचा डोळा आहे आणि मतदार याद्यांवर ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे, त्यावर लक्ष ठेवा असे राज यांनी म्हटले. त्यांनी पुढे म्हटले की, ही आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक मराठींसाठी शेवटची निवडणूक ठरू शकते. आपण गाफील राहिलो तर मुंबई हातातून गेली, असंच समजा असा इशारा त्यांनी दिला. मुंबई ही मराठी जनतेच्या हातातून गेल्यास ही लोक (सत्ताधारी) “थैमान घातलं जाईल” असा इशारा देत त्यांनी मराठी मतदारांना जागं राहण्याचं आवाहन केलं.
मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती?
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दोन्ही पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहेत. मनसेने १२५ प्रभागाची यादी ठाकरे गटाकडे दिल्याची माहिती समोर आली आहे.
