राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपचे नेते आणि माजी आमदार राजन पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागील 40 वर्षापासून आमच्यावर अशा पद्धतीचे आरोप होत आहेत. कारण त्यांच्याकडे दुसरा कोणताही मुद्दा नाही. तुम्ही ग्रामस्थांना विचारा ते सांगतील. इथे जन्म झालेल्या लोकांना विचारा इथे दादागिरी आहे की लोकशाही? एखादं गाव दहशतीत पाच ते दहा वर्षे चालू शकतं? मात्र दोन दोन पिढ्या गाव दहशतीत चालू शकत नाही, अशी प्रतिक्रिया राजन पाटील यांनी दिली.
advertisement
"बाहेरचं पार्सल आणून निवडणूक लादली"
ते पुढे म्हणाले की, "अनगरचे लोक सधन आणि सुज्ञ आहेत. मात्र पूर्वजांनी एकोप्याने राहण्याचे शिकवले आहे. त्यामुळे तिसऱ्या पिढीतही दादागिरी न करता समन्वयाने बिनविरोध निवडणूक होतं आहे. मी ज्या पक्षात होतो. त्या पक्षाची अवस्था अशी आहे की त्यांना चिन्हावर उमेदवार मिळत नाही. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेले पक्ष आणि पक्षाचे नेते बाहेरचे पार्सल आणून इथे निवडणूक लादत आहेत. दुसरं कारण म्हणजे भाजपची नगरपंचायत बिनविरोध होते यातून केलेले हे कृत्य आहे."
"गाव पेटावं म्हणून विरोधक काम करतायत"
"२ डिसेंबरला निवडणूक आहे. जनता जनार्दन दाखवून देईल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल... निवडणूक लागल्याबद्दल आमच्या मनात कोणतंही शल्य नाही, मात्र आर आर पाटील उपमुख्यमंत्री होते, तेव्हा गाव पेटू नये म्हणून गाव एकोप्याने राहील असा प्रयत्न आम्ही केला. मात्र त्याच पक्षाचे आताचे नेते राज्यात गाव पेटलं पाहिजे म्हणून काम करत असतील तर जनता आता दूधखुळी राहिली नाही. मी अजित पवारांचे नाव घेतलं नाही, मी ज्या पक्षात होतो त्या पक्षात जिल्ह्यात एक उमेदवार मिळाला नाही, अशी अवस्था आहे, असंही राजन पाटील म्हणाले.
"...म्हणून आम्ही नालायक आहोत दाखवण्याचा प्रयत्न"
निवडणूक प्रक्रियेबद्दल सांगताना राजन पाटील पुढे म्हणाले की, "आमच्या गावात सर्व धर्माच्या लोकांना बोलावून त्यातून उमेदवार निश्चित केला जातो. उज्ज्वला थिटे यांनी म्हटलं असतं तर गावाने त्यांच्या उमेदवारीबाबतही विचार केला असता. पण त्यांना एवढं हॅमर केलं गेलं की साप साप म्हणून त्या सुतळीलाही धोपटू लागल्या आहेत. अशाप्रकारे ही निवडणूक आमच्यावर लादली गेली. त्यांनी म्हटलं असतं तर उमेदवारी अर्ज माघारी घेतला असता. मात्र हे मी एकटं ठरवत नाही तर गाव ठरवतो. निवडणूक लादल्याचं दुःख नाही मात्र आमची दहा गाव एकत्र राहतात. त्यांच्यात विष पेरण्याचा हा प्रयत्न आहे. त्याची मला भीती आहे निवडणुकीची नाही. त्यांना जिल्ह्यात उमेदवार मिळत नाही म्हणून आम्ही नालायक आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न काही बगलबच्चे करत आहेत. या सर्वांच्या मागे थेट अजित पवार आहेत, असा आरोप आम्ही करत नाही. मात्र ज्या पद्धतीने यंत्रणा लागली आहे, ते पाहता हे काही ऐबूगैबूचं काम नाही, असंही राजन पाटील म्हणाले.
