मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत सामाजिक समीकरण जुळवून आणण्याचा निर्धार व्यक्त करणाऱ्या राजरत्न आंबेडकर यांनी जरांगे यांच्या निवडणूक माघारीच्या निर्णयावर नापसंती व्यक्त केली आहे. त्यांच्या निर्णयाचा मला आदर आहे. पण माघार घेण्याच्या निर्णयाचे त्यांनी दिलेले कारण खोटे आहे, असे ते म्हणाले.
अनेकांनी जमिनी विकून, नोकऱ्या सोडून लोक निवडणुकीसाठी तयार झाले होते. मनोज जरांगे यांच्या आवाहनानुसार अनेकांनी अर्ज भरले. पण जरांगेनी माघार घेतल्यामुळे लोकांची अडचण झाली. दलित आणि मुस्लीम यांनी यादी दिली नाही म्हणून माघार घेतली असल्याचे जरांगे म्हणाले. मात्र जरांगे चुकीचे सांगत आहेत, आम्ही त्यांच्याकडे यादी सुपूर्द केली होती, असा गौप्यस्फोट राजरत्न आंबेडकर यांनी केला.
advertisement
मनोज जरांगे यांनी लोकांची दिशाभूल करू नये. मराठा समाजातील आणि दलित समाजातील अनेकांचे मला फोन येत आहेत. तुम्ही यादी का दिली नाही? अशी विचारणा करणारे फोन आल्याने त्यांना काय उत्तरे देऊ? मी त्यांना वस्तुस्थिती सांगतो आहे. इतके उमेदवार होते की बऱ्याच जणांना माघार घ्यायला लागली असती. परंतु यादीचे कारण पुढे करून जरांगे वेळ मारून नेत आहेत, असे आंबेडकर म्हणाले.
मनोज जरांगे यांच्यासाठी राजरत्न आंबेडकर लढले होते?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी आंतरवाली सराटीत जाऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची अनेकदा भेट घेतली होती. मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. आम्ही तुमच्यासाठी फक्त मत देणारे साधन आहोत का? असा सवाल करीत मनोज जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी किंवा विरोधक दोन्ही पक्षांना प्रचारासाठी उतरू देणार नाही अशी परिस्थिती निर्माण करू असा इशारा त्यांनी दिला होता. त्यावेळी जरांगे यांची तब्येत ढासळलेली पाहून राजरत्न आंबेडकर यांच्या डोळ्यात पाणी आले होते.
