गुरुवारी रात्री, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दोन तास बैठक पार पडली. महत्त्वपूर्ण बैठकीत तिढा सोडवला गेला असल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी पत्रकार परिषद घेत रविंद्र चव्हाण यांनी युतीबाबत महत्त्वाची घोषणा केली.
नगर परिषदेच्या प्रचारांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमनेसामने आल्याने महायुतीमध्ये तणाव असल्याची चर्चा सुरू होती. तर, भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना एकमेकांच्या पक्षात प्रवेश दिला जात होता. विशेषत: भाजप आणि शिवसेना शिंदे गटात एकमेकांचे पदाधिकारी फोडण्यावरून तणाव निर्माण झाला होता. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आदी महापालिकांमध्ये परस्पर पक्षातून इनकमिंग सुरू झाले होते. तर, पक्ष फोडाफोडी सुरू असताना शिंदे गट-भाजपच्या नेत्यांमध्ये वार प्रतिवार सुरू होते. त्यामुळे महापालिका निवडणुकीत महायुती की स्वबळ याची चर्चा रंगली होती.
advertisement
नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, युतीसाठी वरिष्ठ नेते आग्रही होते. मुंबई, ठाणे सारख्या महापालिकेत युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर युतीबाबत एक समिती तयार होईल, त्यात चर्चा होईल. स्थानिक पातळीवरील मुद्द्यांवर चर्चा होईल, अशी माहितीदेखील त्यांनी दिली. दोन दिवस आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून महापालिकांमध्ये प्रमुख पदाधिकारी यांच्या कमिटी तयार करून चाचपणी करण्यासाठी व सकारात्मक पुढे जाण्याचा विचार केला असल्याचे त्यांनी सांगितले.
रविंद्र चव्हाण यांनी म्हटले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काही मुद्यांवर चर्चा करण्यात आली. त्यात युती करण्यावर एकमत झाल्याचे त्यांनी सांगितले. पालिका निवडणुकीत कसं सामोरे जायचं याबद्दल चर्चा झाली. महायुतीमध्ये निवडणुका लढवण्यामध्ये वरिष्ठांमध्ये चर्चा झाली आहे. महायुतीमध्ये भाजपसोबत शिवसेना आणि स्थानिक पातळीवर इतर पक्षांसोबतही चर्चा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
२९ महापालिकांमध्ये त्या ठिकाणची परिस्थिती बदलते.पूर्वीच्या परिस्थितीत फरक आहे. त्यामुळेच युतीच्या चर्चांच्या अनुषंगाने समितीची स्थापना केली जाईल. या कमिटी निर्णय प्रक्रिया सुरू करतील असेही रविंद्र चव्हाणांनी सांगितले. मुंबई व नजीकच्या प्रमुख महापालिकांमध्ये युती करण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
