गेल्या काही दिवसात पुण्यातील भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात पुण्यातील शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी आरोपांच्या फैरी डागल्यात. सुरुवातीला जैन होस्टेल खरेदी प्रकरणारून निर्माण झालेल्या वादात धंगेकरांनी मोहोळांवर आरोप लड लावलीय. मोहोळ हे पुण्याचे महापौर असताना त्यांनी वापरलेली LN241025111V कार एका बिल्डरची होती, असा दावा धंगेकरांनी केलाय. तर मोहोळांनी धंगेकरांचे हे आरोप फेटाळून लावलेत.
advertisement
रवींद्र धंगेकर हे दरदिवशी आरोपांच्या फैरी डागत असतानाच मुरलीधर मोहोळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी रात्री वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. धंगेकरांनी केलेल्या आरोपानंतर या भेटीला महत्व प्राप्त झालं होतं. या भेटीनंतरही धंगेकरांनी मोहोळाविरोधात आघाडी कायम ठेवलीय...तर पुण्यातील भाजप नेत्यांनी पत्रकार घेत धंगेकरांचे आरोप खोडून काढलेत.
धंगेकरांना जो निरोप द्यायचा तो दिलाय- एकनाथ शिंदे
धंगेकर आणि मोहोळ यांच्या वादात महायुतीतही कलगीतुरा रंगलाय. भाजप नेत्यांनीही धंगेकरांना थेट इशाराच दिलाय. धंगेकर प्रकरणावरून महायुतीत जुंपल्याचे चित्र समोर आले आहे. धंगेकरांनी मोहोळ यांच्याविरोधात आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवलेला असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धंगेकर यांना सल्ला दिलाय. धंगेकरांना जो निरोप द्यायचा तो दिलाय, महायुतीत मतभेद होता कामा नये, असे त्यांना सांगितल्याचे शिंदे म्हणाले. परंतु शिंदे यांच्या सल्ल्यानंतरही रविंद्र धंगेकर यांनी आरोपांची मालिका सुरूच असल्याने शिंदे यांनी कोणता निरोप दिला आहे, अशी चर्चा सुरू आहे.
एकनाथ शिंदे यांनी दिलेला सबुरीचा सल्ला धंगेकर ऐकणार की मोहोळांविरोधातली तलवार बाजी सुरूच ठेवणार याचे उत्तर लवकरच कळेल. मात्र धंगेकरांच्या आक्रमक पवित्र्यामुळे महायुतीतच कलगीतुरा रंगल्याचे स्पष्ट आहे.
