मेंटेनन्स शून्य, तरीही सर्व सुविधा
सामान्यपणे उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये लिफ्ट, सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही, वीज, पाणी, साफसफाई आणि इतर सुविधांसाठी दरमहा 5 हजार ते 20 हजार रुपयांपर्यंत मेंटेनन्स आकारला जातो. मात्र जॉली मेकर सोसायटीमध्ये हे चित्र पूर्णपणे वेगळे आहे. येथे रहिवाशांना कोणताही मासिक मेंटेनन्स भरावा लागत नाही. सोसायटीचा सर्व खर्च स्वतःच्या उत्पन्नातून भागवला जातो.
advertisement
सोशल मीडियावर चर्चेचा विषय
अलीकडेच पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी सोशल मीडियावर या सोसायटीच्या अनोख्या आर्थिक मॉडेलची माहिती शेअर केली. त्यानंतर संपूर्ण देशभरात या सोसायटीची चर्चा सुरू झाली. “मेंटेनन्स नाही, उलट नफा” ही संकल्पनाच अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरली आहे.
1970 च्या दशकातील दूरदृष्टी
या यशामागे 1970 च्या दशकातील एक दूरदृष्टीचा निर्णय कारणीभूत ठरला आहे. जॉली मेकर इमारतीचे बांधकाम होत असताना बिल्डरने एक अट घातली होती. या सोसायटीत फ्लॅट खरेदी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नरीमन पॉईंट येथील एका व्यावसायिक (कमर्शियल) इमारतीतही हिस्सा घ्यावा लागणार होता. त्या काळात अनेकांना हा निर्णय आर्थिकदृष्ट्या जड वाटला होता. मात्र आज तोच निर्णय सोसायटीसाठी वरदान ठरला आहे.
भाड्याच्या उत्पन्नातून आर्थिक स्थैर्य
नरीमन पॉईंटमधील त्या व्यावसायिक इमारतीतून दरमहा 50 लाख रुपयांहून अधिक भाडे उत्पन्न मिळते. हे संपूर्ण उत्पन्न थेट जॉली मेकर सोसायटीच्या खात्यात जमा होते. या रकमेतून सोसायटीतील कर्मचाऱ्यांचे पगार, इमारतीची देखभाल, दुरुस्ती आणि इतर खर्च भागवले जातात. खर्च वजा जाता उरलेली रक्कम वर्षाअखेरीस सर्व फ्लॅट मालकांमध्ये समान वाटली जाते. त्यामुळे काही रहिवाशांच्या खात्यात दरवर्षी 2 ते 2.5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा होते.
घर की गुंतवणूक?
आजच्या काळात जिथे घर म्हणजे खर्चाचे साधन मानले जाते, तिथे जॉली मेकर सोसायटीने घरालाच उत्पन्नाचे माध्यम बनवले आहे. त्यामुळे ही सोसायटी केवळ राहण्याचे ठिकाण न राहता एक यशस्वी आर्थिक मॉडेल ठरली आहे. वाढती महागाई आणि मेंटेनन्सच्या ओझ्यात दबलेल्या मुंबईकरांसाठी जॉली मेकर सोसायटी हा एक आदर्श उदाहरण म्हणून पाहिले जात आहे.
