निवडणूक आयोग म्हणतंय- सर्वजाती-धर्माचे तब्बल १८८ मतदार एकाच घरात
बोगस मतदारांच्या माध्यमातून ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून आणून संविधान, आरक्षण आणि लोकशाही संपवण्याचा प्रयत्न होत असून त्यासाठी देशभर बोगस मतदारांची नोंद करण्यात आली, हे आता लपून राहिलं नाही. त्याचाच भांडाफोड करण्यासाठी शिरुर विधानसभा मतदारसंघातील केसनंद (ता. हवेली) येथील घर क्रमांक १ या एकाच घरात विविध राज्यातील सर्वजाती-धर्माचे तब्बल १८८ मतदार राहत असल्याची नोंद मतदार यादीमध्ये करण्यात आली होती. हीच नोंद असलेल्या घराचा शोध घेऊन या घर क्रमांक १ या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी माजी आमदार अशोकबापू पवार यांच्यासह आम्ही सर्वजण गेलो असता संबंधित ठिकाणी शोध घेतला. स्थानिक ग्रामपंचायतीकडे आणि स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली परंतु असं कोणतंच घर याठिकाणी नसल्याची आणि मतदार यादीतील या लोकांना आम्ही कुणीही ओळखतही नसल्याची अपेक्षेप्रमाणे माहिती दिली, असे रोहित पवार यांनी सांगितले.
advertisement
केसनंदमध्ये वाजवलेले फटाके मतदारांना जागृत करण्यासाठी
त्यामुळे मतदार यादीत असलेल्या परंतु प्रत्यक्षात नसलेल्या १८८ मतदारांसोबत प्रतिकात्मक फाटके फोडून दिवाळी साजरी केली आणि मतदार यादीतील बोगसपणा जनतेपुढं उघड केला. ही लोकशाहीची हत्या असून याविरोधात महाविकास आघाडी म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो आहोतच. आज केसनंदमध्ये वाजवलेले फटाके हे दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी नाही तर अधिकाधिक मतदारांना जागृत करण्यासाठी केलेला एक प्रयत्न होता, असे रोहित पवार यांनी आवर्जून सांगितले. लोकशाही वाचवण्यासाठी आता जनतेनेही पुढं येण्याची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त करून र्वजण मिळून या बोगसगिरीला निश्चितच चाप लावू, असा निर्धार त्यांनी केला.