अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात बारामती येथे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर शासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आली. राज्य शासनाकडून तीन दिवसांचा शासकीय दुखवटाही जाहीर करण्यात आला. संपूर्ण राज्य शोक सागरात बुडाले असताना मात्र मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने फाईलींवर सह्या करून 'स्वार्थ' पाहिल्याची चर्चा आहे.
रोहित पवार म्हणाले, वंगाळ झालंय सगळंच!
advertisement
अजित पवार यांच्या निधनानंतर ज्या वेगाने विचाराधीन फायलींवर अधिकाऱ्यांकडून सह्या केल्या गेल्या ते पाहता सगळंच वंगाळ झालंय, असा वाटायला लागलंय अशा संतप्त भावना आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केल्या. सर्वच वंगाळ झालंय, माणसाची काही किंमत आहे कि नाही? थोड्या फार तर भावना, संवेदना असायला हव्यात की नाही? असे प्रश्न रोहित पवार यांनी विचारले.
अजित पवार यांच्या जाण्याने रोहित पवार प्रचंड व्यथित
अजित पवार यांच्या अपघाती जाण्याने पुतण्या रोहित पवार प्रचंड व्यथित झाले आहेत. अजित पवार यांचा मृत्यू हा घात की अपघात असा प्रश्न विचारून त्यांनी सनसनाटी दावे करणारी पत्रकार परिषद घेतली. माझा काका गेलाय, सरकारला उत्तरे द्यावीच लागतील म्हणून त्यांनी व्यवस्थेवर दबाव आणला.
त्या फायलींवर सह्या करायला कुणाचे आदेश? मंत्रालयात जोरदार चर्चा
अल्पसंख्याक विभागाने स्थगित असलेल्या ७५ शाळांना अल्पसंख्याक संस्था किंवा शाळांचा दर्जा दिला. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे अजित पवार यांचे ज्यादिवशी निधन झाले, त्याच दिवशी सात संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तसेच इतरही संस्थांना परवानगी दिल्याच्या तारखा या दुखवट्यादरम्यानच्या आहेत. त्यामुळे मंत्रालयातूल कोणत्या अधिकाऱ्याने हे कारस्थान केले, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
