मुंबई महानगर पालिका निवडणूकही राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाची बनली आहे. विशेषतः ठाकरेंच्या शिवसेनेला टक्कर देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्वतः मैदानात उतरल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखीत करण्याचा प्रयत्न संघाकडून होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये संघाकडून आपल्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. विधानसभेप्रमाणेच मु्ंबई महापालिकेत हिंदुत्वाच्या मुद्यावर मतांची बेगमी करण्यासाठी संघाने नियोजन केले असल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
'ठाकरे मुक्त' मुंबईसाठी संघाचा खास प्लान...
विधानसभा निवडणुकीनंतर आता मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात उतरले आहेत. मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये संघांची बारीक नजर असणार आहेत. संघ आणि परिवारातील संघटनांच्यावतीने पुढच्या दोन महिन्यात मुंबईत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदु मतदारांना साद घालण्यात येणार आहे.
मुंबईतील हिंदू मतांसाठी संघाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. आता आगामी रणनीती ठरवण्यासाठी आणि मु्ंबई महापालिकेतून ठाकरेंना संपवण्यासाठी लवकरच मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या दृष्टीने संघ सर्व्हे करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या हालचालींमुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. याआधीच भाजप व शिंदे गटाकडून मुंबईतील मजबूत मोर्चेबांधणी सुरू आहे, आणि त्यात आता पाठबळ मिळाल्यास मुंबईतील राजकीय चित्र मोठ्या प्रमाणावर बदलू शकते, अशी चर्चा आहे.