नाशिकच्या विकृत भोंदूच्या काळ्या कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरून गेलाय. बड्या बड्या नेत्यांचा गुरु असलेल्या कॅप्टन अशोक खरातच्या अनेक कारनाम्यांचा भांडाफोड होतो आहे. लोकांची कुंडली सांगणाऱ्या कॅप्टन खरात याच्या काळ्या कारनाम्यांची अख्खी कुंडलीच पोलिसांच्या हाती लागली आहे. अशोक खरात प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. दुसरीकडे खरात याच्याशी असलेली जवळीक चाकणकर यांना भोवणार असल्याचे चित्र आहे. कारण खरातचा गोरखधंदा उघडकीस आणणाऱ्या पत्रकारांना चाकणकरांनी धमकीचे फोन केल्याचे आरोप आहेत. तसेच चाकणकर यांचे खरात यांच्याशी कौटुंबिक संबंध असल्याचेही निष्पन्न झाल्याने त्यांची विकेट जाणार, अशी जोरदार चर्चा आहे.
advertisement
अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर सुनेत्रा पवार यांची भेट घेणार
खरात प्रकरणाच्या संदर्भाने आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी रुपाली चाकणकर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असल्याचे कळते आहे. तत्पूर्वी त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतल्याची माहिती आहे.
नाशिकच्या प्रकरणावर सुनील तटकरे काय म्हणाले आहेत?
नाशिकच्या खरात प्रकरणाच्या अनुषंगाने जी काही माहिती बाहेर येते आहे, ती उद्विग्न करणारी आहे. देवाच्या आणि श्रद्धेच्या नावाने अशा काही गोष्टी होतील अशी कल्पना मी किंवा कोणीच कधीही करू शकत नाही.
सार्वजनिक जीवनात वावरताना प्रत्येकाचाच अनेक व्यक्तींशी तसेच संस्थांशी संपर्क येतो. अनेकदा या संपर्काचे स्वरूप थेट स्वरूपाचे असतेच असे नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की, एखादे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घातले जाईल. उलट या प्रकरणातील पीडितांनी समोर येऊन पोलिसात तक्रार नोंदवावी. आमचे सरकार या प्रकरणात ठाम भूमिका घेऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सुद्धा या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाच्या दृष्टीने काय पावलं उचलायला हवीत ती आम्ही उचलू, असे सूचकपणे सुनील तटकरे म्हणाले. त्यांच्या पोस्टमधून चाकणकर यांचा राजीनामा होऊ शकतो, असे संकेत मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
