नाशिक महिला अत्याचार प्रकरणात आध्यात्मिक गुरू म्हणावला जाणारा अशोक उर्फ कॅप्टन खरात याला अटक झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरात याच्या सोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यावरून आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे. एक वर्षापूर्वीच निनावी छापलेल्या बातमीमध्ये चाकणकरांनी संबधित संपादकाला फोन करून माफी मागायला लावली होती. त्यामुळे चाकणकर यांना खरंच अशोक खरातचे काळे कारनामे माहीत नव्हते का? असा प्रश्न उपस्थित होतोय. एक वर्षापूर्वी नेमकं काय घडलं होतं? याबाबत पत्रकार दत्तात्रेय खेमनर यांनी सांगितले आहे.
advertisement
भोंदूबाबाची बातमी करणाऱ्या पत्रकाराला चाकणकरांचा धमकीचा फोन
एक वर्षापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील एका स्थानिक वृत्तपत्रात, थेट नाव न घेता 'कॅप्टन भोंदूबाबा याच्याकडून महिलांचे लैंगिक शोषण' या मथळ्याखाली वृत्त छापून आले होते. त्यावेळी अशोक खरात याच्या विरोधात बातमी लावताच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी थेट पत्रकार दत्तात्रय खेमनर यांना फोन केला. माफी मागा अन्यथा गुन्हा दाखल करायला लावते, अशी धमकीच रुपाली चाकणकर यांनी दिल्याचा आरोप खेमनर यांनी केलाय. महिला आयोगाकडून 'स्यु-मोटो' गुन्हा दाखल करण्यासाठी चाकणकर यांनी पोलीस स्टेशनला पत्र दिल्याचा दावाही खेमनर यांनी केला.
माफीनामा लिहून द्या अन्यथा...फोन करून मला धमकी दिली
अशोक खरात याने 5 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली होती. तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील खेमनर यांना फोन करून माफीनामा सादर करण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
भोंदू बाबा खरातच्या काळ्या कृत्याची आमच्याकडे माहिती आली होती. त्याआधारे आम्ही बातमी केली होती. अन्यायाविरोधात लढताना खरे तर आम्हाला त्यांनी साथ देणे गरजेचे होते. मात्र त्यांनी आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांचा आवाज दाबून त्यांनी खरातला पाठीशी घातले. श्रीरामपूर पोलीस स्टेशनला त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र दिले होते, अशी धक्कादायक माहिती पत्रकार संपादक दत्तात्रेय खेमनर यांनी दिली.
चाकणकर नॉट रिचेबल
दरम्यान, रुपाली चाकणकर यांची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
