या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना आंचल म्हणाली की, सक्षम आणि माझे दोन्ही भाऊ चांगले मित्र होते. सक्षम आमच्या घरी नेहमी यायचा. यातून तीन वर्षांपूर्वी आमचे प्रेमसंबंध जुळले. तेव्हा सक्षम आणि मी दोघेही 16 ते 17 वर्षांचे होतो. वर्षभरापूर्वी माझ्या कुटुंबीयांना प्रेम प्रकरणाची माहिती मिळाली. वर्षेभरापूर्वी वडील आणि भावांनी सक्षम विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकला, धमक्या दिल्या. तक्रार दे असा त्यांचा दबाव होता. गुन्हा दाखल केला नाही, तर आम्ही सक्षमला मारून टाकू किंवा स्वतः जीव देऊ अशा धमक्या घरचे देत होते. शस्त्रांचा धाक दाखवत होते.
advertisement
त्यामुळे वर्षभरापूर्वी मी अल्पवयीन असताना सक्षम विरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती, अशी कबुली आँचलने दिली. मात्र 18 वर्षे पूर्ण होताच मी स्वतः न्यायालयात जाऊन सक्षमच्या बाजूने साक्ष दिली, असंही आंचलने सांगितलं. त्याच गुन्ह्यात सक्षमवर एमपीडीएची कारवाई झाली. तो गुन्हेगार नव्हता. पोलीस माझ्या वडिलांकडून पैसे घेऊन जात होते. माझ्या वडील आणि भावांनी दोन नंबरचे धंदे करून पैसे कमवले. तीन वर्षात माझ्यावर खूप दबाव टाकला, खूप वेळा मारहाण करण्यात आली. सक्षमला मी सगळं सांगितलं. पळून जाऊ म्हणाले, पण तो बोलला तुझ्या वडिलांची खूप इज्जत करतो. त्यांना मनवून तुला न्यायचं आहे, असं सक्षम म्हणायचा. माझ्या प्रेमाच माहीत नाही, पण सक्षम माझ्यावर खूप प्रेम करायचा. बापासारखं त्याने माझ्यावर प्रेम केलं, असंही आंचलने सांगितलं.
यावेळी आंचलने सक्षमच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे, त्यांना संरक्षण देण्याची मागणी देखील केली. ती म्हणाली की, मला माझ्या जीवाची भीती नाही. मी ज्यासाठी जगत होते तोच आता राहिला नाही. त्यामुळे मला माझ्या जीवाची भीती नाही. पण सक्षमच्या परिवाराला सुरक्षा द्या. त्यांच्या जीवाला धोका आहे. माझा लहान भाऊ अल्पवयीन आहे, तो सुटून येईल. तो बोलला होता 15-20 दिवसात सुटून येईल, सक्षमच्या परिवाराला सोडणार नाही. त्यामुळे सक्षमच्या परिवाराला सुरक्षा द्या, अशी मागणी आंचलने केली. मला माझ्या प्रेमाची शपथ शेवटपर्यंत ठाम राहील, त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे. घरच्यांनी सांगितलं आता घरात पाऊल ठेवायचा नाही. मी पण त्यांच्या घरी जाणार, नाही इथेच राहणार, असंही आंचल म्हणाली.
