आजपर्यंतच्या निवडणुकीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत राहिलेले त्यांचे भाऊ हेमंत क्षीरसागर यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाले आहे. आता सख्खा भाऊच त्यांचा पक्का राजकीय विरोधक बनून मैदानात पाहायला मिळणार आहे. कारण, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सख्ख्या भावाकडूनच संदीप क्षीरसागर यांना राजकीय आव्हान मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे नगरपालिका निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांना धक्का समजला जात आहे. मागच्या पंचवार्षिकला हेमंत क्षीरसागर हे उपनगराध्यक्ष होते. हेमंत क्षीरसागर हे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांचे लहान भाऊ आहेत
advertisement
संदीप क्षीरसागर यांच्यासमोर मोठे राजकीय आव्हान
हेमंत क्षीरसागर यांनी 'विकासाचा दृष्टीकोन ठेवून भाजपसोबत जात आहे' असे एका वृत्तवाहनिशी बोलताना स्पष्ट केले आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून क्षीरसागर कुटुंबाकडे असलेली नगरपालिकेची सत्ता आणि आता भावा-भावामधील राजकीय संघर्ष यामुळे बीडमधील वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याच्या नेत्या व राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विकास होऊ शकतो, असेही हेमंत यांनी नमूद केले. त्यामुळे आगामी काळात संदीप क्षीरसागर यांच्यासमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
शरदचंद्र पवार पक्षाला भाजपकडून मोठा धक्का
राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला देखील वेग आला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झालं होतं, हे इनकमिंग आजही सुरूच आहे. महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. बीडमध्येही महाविकास आघाडी किंवा महायुतीत फूट पडल्याचेच पाहायला मिळत आहे. त्यातच, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला भाजपकडून मोठा धक्का देण्यात आलाय.
