मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यात मयत पावलेले उत्तम मोहिते आणि हल्लेखोर श्याब्या उर्फ शाहरूख शेख यांच्यात वर्चस्वातून वाद होता. याच कारणातून ही हत्या झाली असावी, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. घटनेच्या दिवशी मंगळवारी उत्तम मोहिते यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या घरासमोर स्टेज टाकून जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता.
या कार्यक्रमाला आरोपी देखील आला होता. जेवण झाल्यानंतर आरोपींचा मयत उत्तम मोहिते यांच्यासोबत वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आठ ते दहा आरोपींनी घरात घुसून मोहिते यांना भोसकलं. या हल्ला इतका भयंकर होता की मोहिते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यादरम्यान हल्लेखोर शाहरूख शेख याचाही मृत्यू झाला आहे. आज सकाळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पण उत्तम मोहितेंवर चाल करून गेलेल्या शाहरूख शेखचा मृत्यू कसा झाला? याची माहिती आता समोर आली आहे.
advertisement
शाहरूख शेख कसा मृत्यूमुखी पडला?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम मोहितेवर हल्ला करत असताना हल्लेखोरांपैकी एकाचा चाकू शाहरुखला लागला. घाव वर्मी लागल्याने पायाची नस कापली गेली, यामुळे घळाघळा रक्त वाहू लागले. या घटनेनंतर शाहरुखला देखील तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र आज सकाळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने शाहरुखचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
उत्तम मोहिते कोण होते?
उत्तम मोहिते हे सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते आणि दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष देखील होते. सांगली शहरातल्या वेगवेगळ्या प्रश्नांवर हटके पद्धतीने मोर्चे काढण्यासाठी त्यांची ओळख होती. त्याशिवाय उत्तम मोहितेंवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल होते. मंगळवारी वाढदिवशीच त्यांची हत्या करण्यात आली.
