मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यात मयत पावलेले उत्तम मोहिते आणि हल्लेखोर शाहरूख शेख यांच्यात वर्चस्वातून वाद होता. याच कारणातून ही हत्या झाली असावी, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. घटनेच्या दिवशी मंगळवारी उत्तम मोहिते यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या घरासमोर स्टेज टाकून जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता.
या कार्यक्रमाला आरोपी देखील आला होता. जेवण झाल्यानंतर आरोपींचा मयत उत्तम मोहिते यांच्यासोबत वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आठ ते दहा आरोपींनी घरात घुसून मोहिते यांना भोसकलं. या हल्ला इतका भयंकर होता की मोहिते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. यावेळी शाहरूख शेख यांच्यावर देखील प्रतिहल्ला झाला. त्याचाही याच घटनेत मृत्यू झाला आहे. आज सकाळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
advertisement
उत्तम मोहिते हे सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते आणि दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष देखील होते. सांगली शहरातल्या वेगवेगळ्या प्रश्नांवर हटके पद्धतीने मोर्चे काढण्यासाठी त्यांची ओळख होती. त्याशिवाय उत्तम मोहितेंवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल होते. मंगळवारी वाढदिवशीच त्यांची हत्या करण्यात आली.
या घटनेची अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितलं की, मोहिते यांनी आपल्या घरासमोरच स्टेज उभारलं होतं. डिजीटल फ्लेक्स लावले होते. जेवणाची पंगत आणि केक कापण्याचा कार्यक्रम ठेवला होता. हे सगळं सुरू असताना उत्तम मोहितेंवर हल्ला करणारे हल्लेखोर देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. दरम्यान, शुभेच्छा देताना उत्तम मोहिते आणि हल्लेखोरांमध्ये वादावाद झाली.
त्यानंतर काही वेळातच आठ ते दहा जणांनी मोहितेवर हल्ला चढवला. सर्वांनी उत्तम मोहिते यांच्यावर घरात घुसून हल्ला केला, हा हल्ला होत असताना यामध्ये हल्लेखोर असणारा शाहरुख शेख याला चाकूचा वर्मी घाव मांडीला बसला. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना सकाळी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल केला असून काही आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती देखील घुगे यांनी दिली.
