भीषण आगीची घटना
विटा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका तीन मजली इमारतीला मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागली. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या स्टील फर्निचरच्या दुकानातून आगीची सुरुवात झाली. आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले आणि ती तिन्ही मजल्यांवर पसरली. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी. आगीमुळे इमारत पूर्णपणे जळून खाक झाली असून, या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चौघांचा जीव गेला.
advertisement
आगीच्या या दुर्घटनेत जोशी कुटुंबातील चौघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. रात्रीच्या वेळी घरात सर्वजण झोपेत असताना ही घटना घडल्यामुळे त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. विष्णू जोशी (वय ४७), सुनंदा विष्णू जोशी (वय ४२) (आई), प्रियांका योगेश इंगळे (वय २५) (मुलगी) सृष्टी इंगळे (वय २) (नात/चिमुकली) यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत घरातील अन्य दोन सदस्य जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एकाच कुटुंबातील चार जणांचा, त्यातही एका दोन वर्षांच्या चिमुकलीचा होरपळून मृत्यू झाल्याने संपूर्ण विटा शहरावर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मोठ्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे विटा शहरात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
