सांगली : म्हैसाळमध्ये एकाच कुटुंबातल्या तिघांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. तिघांसोबत त्यांच्या पाठोपाठ आलेला कुत्राही मृत्यूमुखी पडला. तर लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. शेतात जनावरांना चारा काढण्यासाठी गेले असताना ही घटना घडलीय. मुख्य विद्युत पुरवठा करणारा तार तुटून शेतात पडली होती. तारेला स्पर्श होऊन तिघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर म्हैसाळमध्ये शोककळा पसरली आहे. तिघांच्या नातेवाईकांनी वीज वितरण कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.
advertisement
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मिरज तालुक्यातील म्हैसाळमध्ये सुतारकी माळ परिसरातील वनमोरे मळ्यात विद्युत पुरवठा करणारी तार शेतात पडली होती. शेतात चारा काढण्यासाठी गेलेल्या शेतकरी आणि त्याच्या चुलतभावासह दोन मुलांना शॉक लागून तीन जण जागीच ठार झाले, तर एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. पारिशनाथ मारुती वनमोरे (वय ४०), साईराज वनमोरे (वय १३), प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे (वय ३५) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. तर हेमंत पारिशनाथ वनमोरे वय १४ असे जखमी मुलाचे नाव आहे. जखमी मुलाला मिरज शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पारिशनाथ वनमोरे हे मुलासोबत त्यांच्या शेतात चारा काढण्यासाठी गेले होते. त्याच्या शेतालगत असणाऱ्या सुभाष राजाराम पाटील यांच्या शेतामध्ये मुख्य विद्युत प्रवाह करणारी थ्री फेज वीजेची तार तुटून पडली होती. पारिशनाथ व साईराज यांना शॉक लागून जागीच ठार झाले. तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेला त्यांचा चुलत भाऊ प्रदीप आणि मुलगा हेमंत याला शॉक लागला. प्रदीप हे जागीच ठार झाले आणि यात हेमंत हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती वनमोरे कुटुंबाला समजल्यानंतर वीज प्रवाह खंडित करून हेमंतला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, वनमोरे कुटुंबियांसोबत त्यांचा कुत्राही शेतात गेला होता. मालकांच्या पाठोपाठ चालणारा कुत्राही या घटनेत मृत्यूमुखी पडला आहे. एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूने म्हैसाळमध्ये शोककळा पसरली आहे. नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असून संबंधित वीज महावितरण कंपनीवर ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा भूमिका घेतली आहे.