सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सांगलीत बोलताना आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठं विधान केलंय. ''मराठा आरक्षणासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा, आरक्षण विधेयकात दुरुस्ती करावी. आपण सरकारच्या बाजूने राहू,'' असं शरद पवार म्हणाले. ''50 टक्के आरक्षणावर जाता येत नाही. पण त्याच्यावर जायचं असेल तर संसदेत बदल केला पाहिजे. दुरुस्ती करायला काय हरकत नाही,'' असं त्यांनी म्हटलंय.
advertisement
''तमिळनाडूमध्ये 78% वर आरक्षण जातं तर महाराष्ट्रात 75% वर का होऊ शकत नाही?'' असा सवाल शरद पवार यांनी विचारला. ''50 टक्केच 75 टक्क्यांवर जायला पाहिजे. 75 टक्के झाल्यास सगळ्यांनाच आरक्षण मिळेल. ज्यांना मिळालं नाही त्यांनाही मिळेल आणि कोणताही वाद उरणार नाही,'' असं शरद पवार म्हणाले.
मविआच्या नेत्यांना जागावाटपावर सल्ला
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना जागावाटपावरून सल्ला दिलाय. ते म्हणाले की, ''जागा वाटपाचा विषय लवकर संपवा. लोकांच्यात लवकर जाऊया. वेळ थोडा राहिला आहे. महाराष्ट्रात लोकांना बदल हवा आहे. लोकांचं मत अनुकूल असं आहे. या अनुकूल मताचा आदर करायला हवा.'' येत्या 7, 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका झाल्या आहेत.
अजितदादांचं नेमकं काय ठरलंय? पुन्हा बारामतीतून न लढण्याचे दिले संकेत, भाषणावेळी कार्यकर्ते आक्रमक
प्रकाश आंबेडकरांच्या टीकेवर प्रतिक्रिया
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे मराठ्यांचे नेते झाल्याची टीका केली होती. त्यावरून पवारांनी प्रकाश आंबेडकरांना टोला लगावला. शरद पवार म्हणाले की, ''कालच्या निवडणुकीत पाठिंबा लोकांनी कुणाला दिला हे बघितलं आहे. ज्यांना राज्यात एकसुद्धा जागा मिळत नाही त्यांनी इतरांच्या संबंधित भाष्य करावे आणि मीडियामध्ये नाव छापून येण्यासाठी हे ठीक आहे.''
तिसऱ्या आघाडीला खोचक टोला
महायुती, मविआ यांच्याशिवाय राज्यात तिसरी आघाडीसुद्धा तयार झालीय. यात संभाजीराजे, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांचा समावेश आहे. या तिसऱ्या आघाडीलाही पवारांनी टोला लगावला. ''हे लोक एकत्र येत असतील तर साहजिकच परिणाम होईल. संभाजीराजे आणि इतर सगळे महान घराण्यातले लोक आहेत. त्यामुळे आमची झोप गेलीय. आम्ही भयंकर अस्वस्थ आहोत. आता आमचं काय होणार'' असा प्रश्न पडल्याचा खोचक टोला पवारांनी लगावला.