सांगलीत लोकसभा निवडणुकीत चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारी दिल्यानंतर बराच वाद झाला होता. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. त्यांना मविआच्याच नेत्यांनी मदत केली असा आरोप चंद्रहार पाटील यांनी केलाय. लोकसभेला गद्दारी करणाऱ्यांनी विधानसभेलाही असंच केलं तर त्याची किंमत काँग्रेस, राष्ट्रवादीला मोजावी लागेल असं चंद्रहार पाटील म्हणाले.
advertisement
विधासनभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात ज्या आधीच्या शिवसेना ठाकरे गटाच्या जागा आहेत त्या शिवसेनाच लढवणार, खानापूर आटपाडी आणि मिरज लढवणारच, जो लोकसभेवेळी जी गद्दारी महाविकास आघाडीत राहून काँग्रेस, राष्ट्रवादीने केली ती विधानसभेला केली तर त्याची किंमत काँग्रेस, राष्ट्रवादीला महाराष्ट्रात मोजावी लागेल असा इशारा चंद्रहार पाटील यांनी दिला.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे विधानसभेत तीन तीन जागा आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या विश्वजित कदम यांनी पाच आणि राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी चार जागांवर दावा सांगितलाय. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रहार पाटील यांनी म्हटलं की, सांगलीत ८ मतदारसंघ आहेत. मग या दोन नेत्यांकडून दावा करण्यात आलाय त्याची बेरीज केली तर ९-१० पर्यंत जाते. पण आमच्या ज्या हक्काच्या २ जागा आहेत त्याबाबत पक्षश्रेष्ठींसोबत बोलणं झालंय. आम्ही त्या सोडणार नाही आम्ही १०० टक्के लढवणार आहे. जी गद्दारी लोकसभेला केली ती विधानसभेला केली तर किंमत मोजायला लागेल.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी उद्धव ठाकरेंनी प्रचार केला. उद्धव ठाकरेंनी प्रामाणिक प्रचार केला. उमेदवार कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न केले. काँग्रेसचा एक खासदार होता १३ झाले, राष्ट्रवादीचे चार खासदार होते ते ८ खासदार झाले. हे सगळं श्रेय आदरणीय उद्धव ठाकरेंना जातं. या विजयात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. त्यांच्याच उमेदवाराला सांगलीत गद्दारी करून हरवण्याचा प्रयत्न केला असंही चंद्रहार पाटील यांनी म्हटलं.