मैदानावरच कोसळलं 'स्वप्न'!
मिळालेल्या माहितीनुसार, लोहमार्ग पोलीस भरतीची शारीरिक चाचणी शनिवारी सकाळी सुरू होती. सांगलीहून आलेला संग्राम पूर्ण तयारीत होता. १६०० मीटर धावण्याच्या चाचणीला सुरुवात झाली, संग्राम वेगाने धावत होता. चाचणी पूर्ण होण्याच्या बेतात असतानाच अचानक त्याला चक्कर आली आणि तो मैदानावरच कोसळला. उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि वैद्यकीय पथकाने क्षणाचाही विलंब न लावता त्याला घाटी रुग्णालयात नेले, पण वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.
advertisement
आई-वडिलांचा आधार हरपला!
२३ वर्षांचा संग्राम शिंदे हा घरातला एक उमदा तरुण होता. पोलीस होण्यासाठी त्याने गेल्या अनेक महिन्यांपासून रक्ताचं पाणी केलं होतं. सरावात हजारो वेळा हेच अंतर त्याने पार केलं असेल, पण भरती मैदानावरील 'त्या' १६०० मीटरच्या धावेने एका तरुणाचा जीव घेतला. संग्रामच्या मृत्यूची बातमी सांगलीत त्याच्या गावी पोहोचताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हळहळ आणि प्रश्न...
भरती प्रक्रियेसाठी येणाऱ्या तरुणांवर असलेला शारीरिक आणि मानसिक ताण पुन्हा एकदा या निमित्ताने समोर आला आहे. संग्रामच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येईल. मात्र, एका उमद्या तरुणाचा असा अंत झाल्याने भरतीसाठी आलेल्या इतर हजारो तरुणांच्या डोळ्यातही पाणी आलं होतं.
