Success Story : कापूस शेतीला दिला फाटा, यशस्वी केली टरबूज लागवड, शेतकऱ्याला उत्पन्न मिळालं लाखात, Video
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
तरुण शेतकरी राजेश नवनाथ राठोड यांनी पारंपरिक पिकाला पर्याय शोधत घेतलेला निर्णय सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
बीड : बीड जिल्ह्यातील नित्रुड येथील तरुण शेतकरी राजेश नवनाथ राठोड यांनी पारंपरिक पिकाला पर्याय शोधत घेतलेला निर्णय सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. तीन एकर शेती असलेल्या राठोड यांनी दरवर्षीप्रमाणे कापूस पिकाची लागवड केली होती मात्र अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने ते चिंतेत होते. वाढते खर्च, अनिश्चित हवामान आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे कापसातून समाधानकारक नफा मिळत नव्हता.
या पार्श्वभूमीवर यावर्षी दिवाळीनंतर काहीतरी वेगळे करण्याचा निर्धार त्यांनी केला. पारंपरिक पद्धतीला छेद देत त्यांनी तीन एकरातील कापूस पूर्णपणे उपटून टरबूज लागवडीचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे टरबूज शेतीचा हा त्यांचा पहिलाच अनुभव होता. सुरुवातीला गावातील अनेकांनी त्यांना सावधगिरीचा सल्ला दिला. मागील वर्षी गारपिटीमुळे टरबूज उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते, तसेच बाजारात हमीभाव मिळेलच याची शाश्वती नसल्याचेही सांगण्यात आले.
advertisement
तथापि, न डगमगता राठोड यांनी आधुनिक पद्धतीने लागवड केली. योग्य बियाण्यांची निवड, ठिबक सिंचनाचा वापर आणि वेळेवर खत व्यवस्थापन यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. मेहनतीसोबतच बाजारपेठेचा अभ्यास करून त्यांनी माल थेट व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या नियोजनबद्ध शेतीचा परिणाम पहिल्याच हंगामात दिसून आला.
advertisement
पहिल्याच तोडीत त्यांना सुमारे आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये खर्च वजा जाता घरचे निव्वळ एक ते दोन लाख रुपये शिल्लक राहिल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे अजून एक ते दोन तोडे निघण्याची शक्यता असून अंतिम उत्पन्नात आणखी वाढ होईल, असा त्यांचा अंदाज आहे.
राजेश राठोड यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता बाजारपेठेचा अभ्यास करून पर्यायी पिकांचा विचार केल्यास कमी क्षेत्रातही चांगले उत्पन्न मिळू शकते, हे त्यांच्या उदाहरणातून स्पष्ट झाले आहे. त्यांच्या धाडसी निर्णयामुळे जोखीम घेतल्याशिवाय प्रगती नाही हा संदेश पुन्हा अधोरेखित झाला आहे.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 3:01 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : कापूस शेतीला दिला फाटा, यशस्वी केली टरबूज लागवड, शेतकऱ्याला उत्पन्न मिळालं लाखात, Video








