Nashik : एक किचेन सापडलं अन् खरा गुन्हेगार फसला, नाशिकच्या 'त्या' प्रकरणात धक्कादायक खुलासा
Last Updated:
Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातील एका हत्येचा छडा पोलिसांना लागला असून आरोपींना पकडण्यातही यश आलेले आहे. मात्र यात पोलिसांना आरोपांनी पकडण्यात यश नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे आले ते जाणून घ्या
नाशिक : गुन्हेगार कितीही हुशार असला तरी त्याची एक चुक त्यालाच भारी पडते किंवा पोलिसांना त्याची ओळख करुन देण्यास मदतही होते. सध्या असेच एक प्रकरण नाशिक जिल्ह्यातून समोर आलेला आहे. नेमके हे प्रकरण काय आणि पोलिसांनी कशा प्रकार गुन्हेगारांना पकडण्यात यश मिळाले ते पाहूयात.
नेमकं प्रकरण काय?
नाशिक जिल्ह्यातील वाडीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली होती. नाशिक शहरापासून सुमारे 20 ते 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या सारुळच्या जंगलात एका तरुणीचा निर्घृण खून झाल्याचे उघड झाले.
स्थानिक ग्रामस्थांना जंगलात एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पाहिले असता तरुणीचा गळा चिरण्यात आला होता आणि धक्कादायक बाब म्हणजे तिच्या गळ्यात चाकू तसाच अडकलेला होता. तरुणी अर्धनग्न अवस्थेत आढळली. तिच्या जवळ अर्धवट खाल्लेला पिझ्झाही सापडल्याने संशय अधिकच गडद झाला.
advertisement
एका किचेनवर असलेल्या नावावरून हत्येचा उलगडा
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेत विविध परिसरातून चौकशी सुरू केली. मृत तरुणीची ओळख पटवण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळी सापडलेल्या किचनवरील नाव महत्त्वाचे ठरले. त्या नावाच्या आधारे पोलिसांनी संशयितांपर्यंत पोहोचत तपासाची दिशा निश्चित केली.
अवघ्या काही तासांत पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला. ही हत्या तरुणीच्या आधीच्या प्रियकरानेच केल्याचे उघड झाले. धक्कादायक म्हणजे त्याने आपल्या काही मित्रांच्या मदतीने हा कट रचला होता. मृत तरुणी बुलढाणा जिल्ह्यातील असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी संबंधित आरोपींना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
कॉलेजमधील ओळखीचं प्रेमात रूपांतर
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी काही वर्षांपूर्वी नाशिकमधील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. शिक्षणाच्या काळातच त्याची पीडित तरुणीशी ओळख झाली आणि हळूहळू या ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. काही काळ दोघांचे संबंध सुरळीत सुरू होते. मात्र अलीकडच्या काही महिन्यांत त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता.
दरम्यान तरुणीचे दुसऱ्या एका तरुणासोबत संबंध असल्याची माहिती आरोपीला मिळाली. यामुळे तो संतप्त झाला होता. प्रेयसी आपल्याकडे दुर्लक्ष करत असून तिचे दुसऱ्यावर प्रेम जडले आहे अशी भावना त्याच्या मनात घर करून बसली होती. या संशयातून आणि तीव्र रागातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात समोर आले आहे.
advertisement
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या हत्येसाठी त्याने काही मित्रांची मदत घेतल्याचेही उघड झाले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 2:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik : एक किचेन सापडलं अन् खरा गुन्हेगार फसला, नाशिकच्या 'त्या' प्रकरणात धक्कादायक खुलासा







