पोरा पोलीस होऊन ये! आईचे शब्द कानात घुमले, पण मुलाचा मृतदेहच घरी पोहोचला! सांगलीच्या तरुणाचा मैदानावर दुर्दैवी अंत
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
संग्राम शिंदे सांगलीचा २३ वर्षांचा उमदा तरुण संभाजीनगरच्या पोलीस भरती मैदानात १६०० मीटर धावताना मृत्यूमुखी पडला, या घटनेने पोलीस दलात शोककळा पसरली.
अंगावर खाकी वर्दी चढवायची, आई-वडिलांचं नाव मोठं करायचं आणि देशाची सेवा करायची... याच जिद्दीने सांगलीचा २३ वर्षांचा संग्राम छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस भरती मैदानात उतरला होता. पण कुणाला ठाऊक होतं की, हीच धाव त्याची आयुष्याची शेवटची धाव ठरेल? लोहमार्ग पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान १६०० मीटर धावताना संग्राम शिंदे या तरुणाचा हृदयद्रावक मृत्यू झाला असून, या घटनेने संपूर्ण पोलीस दलात आणि उमेदवारांमध्ये शोककळा पसरली आहे.
मैदानावरच कोसळलं 'स्वप्न'!
मिळालेल्या माहितीनुसार, लोहमार्ग पोलीस भरतीची शारीरिक चाचणी शनिवारी सकाळी सुरू होती. सांगलीहून आलेला संग्राम पूर्ण तयारीत होता. १६०० मीटर धावण्याच्या चाचणीला सुरुवात झाली, संग्राम वेगाने धावत होता. चाचणी पूर्ण होण्याच्या बेतात असतानाच अचानक त्याला चक्कर आली आणि तो मैदानावरच कोसळला. उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि वैद्यकीय पथकाने क्षणाचाही विलंब न लावता त्याला घाटी रुग्णालयात नेले, पण वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.
advertisement
आई-वडिलांचा आधार हरपला!
२३ वर्षांचा संग्राम शिंदे हा घरातला एक उमदा तरुण होता. पोलीस होण्यासाठी त्याने गेल्या अनेक महिन्यांपासून रक्ताचं पाणी केलं होतं. सरावात हजारो वेळा हेच अंतर त्याने पार केलं असेल, पण भरती मैदानावरील 'त्या' १६०० मीटरच्या धावेने एका तरुणाचा जीव घेतला. संग्रामच्या मृत्यूची बातमी सांगलीत त्याच्या गावी पोहोचताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
हळहळ आणि प्रश्न...
भरती प्रक्रियेसाठी येणाऱ्या तरुणांवर असलेला शारीरिक आणि मानसिक ताण पुन्हा एकदा या निमित्ताने समोर आला आहे. संग्रामच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येईल. मात्र, एका उमद्या तरुणाचा असा अंत झाल्याने भरतीसाठी आलेल्या इतर हजारो तरुणांच्या डोळ्यातही पाणी आलं होतं.
Location :
Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 2:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पोरा पोलीस होऊन ये! आईचे शब्द कानात घुमले, पण मुलाचा मृतदेहच घरी पोहोचला! सांगलीच्या तरुणाचा मैदानावर दुर्दैवी अंत










