शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे मागील महिनाभरापासून पक्षाच्या कार्यक्रम, बैठका, पत्रकार परिषदांपासून दूर होते. राऊत यांचा आजार बळावल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी जाहीर निवेदन काढत आपण काही महिने सार्वजनिक कार्यक्रमातून दूर राहणार असल्याचे जाहीर केले होते. त्या निवेदनात राऊत यांनी नवीन वर्षात पुन्हा जोमाने मैदानात उतरण्याचे सूतोवाच केले होते. आता, मात्र महिनाभरातच राऊत मैदानात उतरणात आहेत.
advertisement
शिवसेनेची तोफ धडाडणार...
संजय राऊत हे शिवसेना ठाकरे गटाची तोफ म्हणून ओळखले जातात. आक्रमक भाषेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत ठाकरे गटाची भूमिका जाहीर करतात. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या धामधुमीत संजय राऊत यांची उणीव भासत असल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये रंगली होती. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.
संजय राऊत हे पुढील आठवड्यात सोमवारी, सकाळी १० वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारात होत असलेले आरोप-प्रत्यारोप, महायुतीमधील असंतोष, ठाकरे गट-मनसे यांची संभाव्य युती, मतदार यादीतील घोळ असे अनेक मुद्दे मागील काही दिवसांत चांगलेच चर्चेत आहेत. आता सोमवारी सकाळी माध्यमांशी चर्चा करताना संजय राऊत हे काय भाष्य करणार याची चर्चा सुरू झाली आहे.
