आरोपी जयराम चाटे तब्बल १४ महिन्यांच्या कारावासानंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या धाकट्या भावाच्या उत्तरकार्यासाठी न्यायालयाने चाटेला काही तासांसाठी पोलीस बंदोबस्तात कारागृहाबाहेर जाण्याची परवानगी दिली आहे.
काय आहे न्यायालयाचा निर्णय?
जयराम चाटेचा धाकटा भाऊ श्रीराम चाटे यांचे २ मार्च रोजी तांबवा येथे निधन झाले. हिंदू परंपरेनुसार बाराव्याच्या धार्मिक विधीला उपस्थित राहता यावे, यासाठी चाटेच्या वकिलांनी न्यायालयात विशेष अर्ज दाखल केला होता. जिल्हा व विशेष न्यायालयाने यावर ६ मार्च रोजी सुनावणी घेतली. सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी या अर्जाला कडाडून विरोध केला होता; मात्र न्यायालयाने मानवी दृष्टिकोनातून आरोपीला सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत पोलीस बंदोबस्तात विधीस उपस्थित राहण्याची मुभा दिली. या प्रवासाचा आणि पोलीस बंदोबस्ताचा सर्व खर्च स्वतः आरोपीलाच करावा लागणार आहे.
advertisement
देशमुख कुटुंबीयांचा आक्षेप
जयराम चाटे यांने तुरुंगातून बाहेर येण्यासाठी अर्ज केला होता. त्यावर सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली होती. "धार्मिक विधीच्या निमित्ताने आरोपी गावात येणार असल्याने तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा वेळी काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
१४ महिन्यांनंतर आरोपी पुन्हा गावात येणार असल्याने तांबवा परिसरात पोलिसांचा कडा पहारा असणार आहे. या प्रकरणातील कायदेशीर अटींचे पालन करणे चाटेसाठी बंधनकारक असेल.
