शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांची मदत झाली का? या प्रश्नावर हास्यकल्लोळात भाजपच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे यांनी महेश शिंदे यांची मदत झाल्याची कबुली दिली. तसेच आम्ही यशवंत विचारांचे पाईक असल्याचे सांगत शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि घटक पक्षांनी यशवंत विचारांचा खून केल्याच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले.
महाविकास आघाडीबरोबर आम्ही कसे जाणार? महेश शिंदे काय म्हणाले?
advertisement
आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषद सदस्या प्रिया शिंदे यांची सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाली. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर आमदार महेश शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट करत विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले. उद्धव ठाकरे यांच सरकार आम्ही त्यासाठीच पाडलं होतं की, आमचं प्रिपोल अलायन्स भाजपबरोबर होतं. याच पद्धतीने कोरेगावमध्ये सुद्धा आमचं प्रिपोल अलायन्स भाजप बरोबर होतं. मग आम्ही महाविकास आघाडीबरोबर कसं जाणार? असा सवाल महेश शिंदे यांनी उपस्थित केला.
अध्यक्ष निवडीवेळी राडा, कार्यक्रमाला गालबोट
बहुमतासाठी आवश्यक असलेले संख्याबळ नसतानाही योग्य व्यूहरचना आखून भारतीय जनता पक्षाने अध्यक्ष-उपाध्यक्षपद मिळवले. भाजपच्या प्रिया शिंदे या अध्यक्षपदी निवडून आल्या तर राजू भोसले उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. मात्र, या निवडीच्या कार्यक्रमाला सेना-भाजपच्या संघर्षाचे गालबोट लागले. पालकमंत्री शंभूराज देसाई यांना भाजप कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप शिवसेना कार्यकर्त्यांनी केसला. यावेळी पालकमंत्री देसाई यांच्या डाव्या हाताला जखम झाली.या घटनेचा निषेध व्यक्त करीत झालेला प्रकार दुर्दैवी असल्याचे शंभूराज देसाई म्हणाले. गर्दीत मला कसे लागले हे मला माहिती नाही. जेव्हा रक्त पडू लागले तेव्हा मला समजले, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.
