धरणाची सद्यस्थिती
सध्या कोयना धरणात प्रतिसेकंद सरासरी 33,815 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातील एकूण पाणीसाठा 85.44 टीएमसी (हजार दशलक्ष घनफूट) इतका झाला आहे. पाण्याची आवक कमी झाल्यामुळे सोमवारी सायंकाळी पाच वाजता धरणाचे 6 वक्री दरवाजे साडेसहा फुटांवरून चार फुटांपर्यंत उघडण्यात आले आहेत.
पाण्याचा विसर्ग आणि नदीपातळी
धरणातून विनावापर प्रतिसेकंद 19,724 क्युसेक पाणी सोडले जात आहे. याशिवाय, पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2100 क्युसेक पाणी असे एकूण 21,824 क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ कायम आहे.
advertisement
गेल्या 24 तासांतील पाऊस आणि पाणीसाठा
गेल्या 24 तासांत (रविवार संध्याकाळी पाच ते सोमवार संध्याकाळी पाच या वेळेत) धरणातील पाणीसाठ्यात 2.87 टीएमसीने वाढ झाली आहे. याच कालावधीत कोयना परिसरात 49 मि.मी., नवजा येथे 32 मि.मी. आणि महाबळेश्वरमध्ये 63 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा 80.44 टीएमसी असून, पाण्याची उंची समुद्रसपाटीपासून 2147.3 फूट तर जलपातळी 654.482 मीटर इतकी झाली आहे.
प्रशासनाचा इशारा
कोयना, नवजा आणि महाबळेश्वर या तिन्ही विभागात अजूनही पाऊस पडत असल्याने, धरणात ज्या प्रमाणात पाण्याची आवक होईल, त्यानुसार कमी-जास्त पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे कोयना नदीकाठच्या सर्व गावांनी आणि वस्त्यांनी सतर्क राहावे, असा प्रशासनाचा इशारा कायम आहे.
हे ही वाचा : Weather Alert: मंगळवारी हवामानात मोठे बदल, 9 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
हे ही वाचा : पावसाचा कहर! राजाराम बंधाऱ्यातून 35 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाचा हाय अलर्ट!