शेतकऱ्यांच्या विरोधानंतर मार्गात बदल
महामार्गासाठी जमिनी संपादनाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवल्यानंतर प्रशासनाने नव्याने आराखडा तयार केला आहे. या बदलामुळे काही संवेदनशील भाग वगळण्यात आले असून स्थानिकांचा विरोध कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
१३ जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग
नवीन आराखड्यानुसार हा महामार्ग राज्यातील १३ जिल्ह्यांतून जाणार आहे. एकूण १४ तालुक्यांना जोडत हा मार्ग २१ महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना कनेक्ट करणार आहे. या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हा प्रवास अवघ्या ८ तासांत पूर्ण होणार असून सुमारे १० तासांची बचत होणार आहे.
advertisement
सावंतवाडी आणि दोडामार्गला प्राधान्य
नव्या योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांना विशेष स्थान देण्यात आले आहे. काही गावांना वगळून नवीन गावांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे स्थानिक पातळीवरील संतुलन राखण्याचा प्रयत्न दिसून येतो.
कोणत्या गावांचा समावेश?
सावंतवाडी तालुक्यातील केगद (चौकुळ), डेगवे, बांदा, पडवे आणि माजगाव या गावांचा महामार्गात समावेश करण्यात आला आहे. तर दोडामार्ग तालुक्यातील कुंभवडे, भेकुर्ली, कोलझर, तळकट आणि झोळंबे ही गावे नव्या आराखड्यात समाविष्ट करण्यात आली आहेत.
अनेक जिल्ह्यांच्या मार्गात बदल
शक्तीपीठ महामार्ग आता वर्धा, यवतमाळ, बीड, लातूर आणि सातारा या जिल्ह्यांतून जाणार आहे. याशिवाय नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या मार्गातही बदल करण्यात आले आहेत.
प्रकल्पामुळे प्रवास सुलभ होणार
या महामार्गामुळे विदर्भ ते कोकण प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे. धार्मिक पर्यटनालाही चालना मिळण्याची शक्यता असून राज्याच्या विकासाला गती मिळेल, असा सरकारचा दावा आहे.
