लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ‘पिपाणी’ या चिन्हामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फटका बसल्याचा दावा करण्यात आल होता. अखेर निवडणूक आयोगाने या चिन्हावर कारवाई केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी (ट्रम्पेट)’ हे चिन्ह वगळण्यात आले आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला दिलासा देणारा हा निर्णय मानला जात आहे. ‘पिपाणी’ या चिन्हाचे नाव ‘तुतारी’ या पक्षाच्या अधिकृत चिन्हाशी साधर्म्य असल्याने सामान्य मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होत होता. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ‘तुतारी’ऐवजी अनेक मतदारांनी ‘पिपाणी’ चिन्हावर मतदान केल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला होता. त्याचा फटका पक्षाला बसला.
advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने या संदर्भात निवडणूक आयोगाकडे वारंवार तक्रार केली होती. मात्र, सुरुवातीला आयोगाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाने हा निर्णय घेतला असून, १९४ मुक्त चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’चे नाव कायमचे वगळले आहे.
पिपाणीने मते खेचली, तुतारीला पराभवाचा धक्का...
मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ‘पिपाणी’ चिन्हावर अपक्ष उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर मते मिळाल्याचे चित्र होते. विशेषतः शिरूर, बारामती, सातारा, भिवंडी, दिंडोरी, रावेर, अहमदनगर, बीड आदी मतदारसंघांत या चिन्हाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. सातारा लोकसभेची जागा पवार गटाला ‘पिपाणी’ चिन्हामुळे थोडक्यात गमवावी लागली होती.
विधानसभेत १९ जागांवर फटका...
शरद पवार गटाच्या आकडेवारीनुसार, जितूर, घनसावंगी, शहापूर, बेलापूर, अणुशक्तीनगर, आंबेगाव, पारनेर, केज आणि परांडा या विधानसभा मतदारसंघांत पिपाणी चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवारांना पक्षाच्या उमेदवारांपेक्षा जास्त मते मिळाली होती. या मतांची विभागणी झाली नसती तर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे किमान १९ आमदार निवडून आले असते, असा पक्षाने दावा केला होता.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘तुतारी’ आणि ‘पिपाणी’ या नावांचा गोंधळ कायमचा दूर झाला असून, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला निवडणूक रणधुमाळीत थोडा दिलासा मिळणार आहे.
