राज्यातील काही ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने युती करत निवडणुकीला सामोरं जाण्याची रणनीती आखली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मुक्ताई नगर शहरात आपल्या पक्षाची ताकद कमी आहे. त्यामुळे वेळ पडली तर आम्ही या ठिकाणी निवडणुका लढविणार नसल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी जाहीर केल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे.
advertisement
मुक्ताई नगर तालुका हा एकनाथ खडसे यांचा बालेकिला मानला जातो. मात्र याच बालेकिल्ल्यात मुक्ताई नगर शहरामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद कमी असल्याची कबुली एकनाथ खडसे यांनी दिली आहे. ग्रामीण भागात राष्ट्रवादीची पकड मजबूत असली तरी शहरात कार्यकर्त्यांची संख्या आणि संघटनात्मक ताकद कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.
खडसे यांनी म्हटले की, “मुक्ताईनगर शहरात आमचे कार्यकर्ते पूर्वीपासूनच कमजोर आहेत. पंचायत समिती निवडणुकीतही आम्ही केवळ चार ते पाच अशाच जिंकण्यासारख्या जागांवर उमेदवार देण्याचा विचार करत आहोत. आवश्यकता भासली तर त्या जागाही आम्ही लढवणार नाही,” असे खडसे यांनी स्पष्ट केले.
खडसे यांच्या या वक्तव्याने आगामी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गट स्पर्धेतून बाहेर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खडसेंचा हा ‘संकेत’ उघडपणे कबुलीच्या रूपात समोर आल्यानंतर मुक्ताईनगरच्या राजकीय वर्तुळात नवे समीकरण निर्माण होण्याची चर्चा सुरू झाली आहे.
