शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यात यावे यासाठी राष्ट्रवादीकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी आज उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली. या भेटीनंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती दिली होती. दरम्यान दुसरीकडे काँग्रेसचा राज्यसभेच्या एका जागेसाठी शरद पवार यांच्या नावाला पाठींबा असल्याची माहिती काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
advertisement
ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका स्पष्ट नाही
दरम्यान मागील दोन आठवड्यापासून महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेच्या एका जागेवरून मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. त्यातच, आता शेवटच्या क्षणी शरद पवारांच्या नावावर महाविकास आघाडीमध्ये एकमत झालेले पाहायला मिळत नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा शरद पवारांना पाठिंबा आहे. मात्र अद्याप ठाकरेंच्या शिवसेनेने कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही.
काँग्रेस हायकमांडचा आदेश
राज्यसभेसाठी शरद पवारांनी पुन्हा एकदा इच्छा व्यक्त केल्याने या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंसह दिल्लीमधील काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. त्यानंतर आता काँग्रेसच्या हायकमांडने शरद पवारांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
विजय वडेट्टीवार म्हणाले, आम्ही राज्यसभेची जागा आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे दावा केला होता. पण राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांनी दिल्लीशी संपर्क केला आणि उद्धव ठाकरेंशी संपर्क केला. यामध्ये शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळणार आहे. आमच्या हायकामंडने पवार साहेबांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे.. आता आम्हाला फोन आला की मल्लिकार्जुन खर्गे यांनी पवार साहेबांना पाठींबा देऊन पाठवलं पाहिजे असं ठरलं आहे. मात्र तीन पक्षाच्या आघाडीमध्ये जे काही ठरेल, ते अंतिम होईल. जोपर्यंत तिन्ही पक्ष मिळून जोपर्यंत पुढे जात नाही, ,तोपर्यंत यावरचा हा अंतीम निर्णय असल्याचे कारण नाही.
राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक
राज्यसभा निवडणुकीसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. राज्यसभेच्या 37 जागांपैकी सर्वाधिक 7 जागा महाराष्ट्रातून निवडून दिल्या जाणार आहेत. तामिळनाडूतून 6, बिहार आणि पश्चिम बंगालमधून 5 आणि ओडिशा राज्यातून 4, आसामधून 3, तेलंगाणातून 2 आणि छत्तीसगड, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमधून प्रत्येकी एक जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.
