निवडणूक याचिकेवर न्यायालयाचा निर्णय
थोरात यांनी खताळ यांच्या निवडणुकीला आव्हान देत न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत खताळ यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाचा स्रोत तसेच कर थकबाकीची माहिती पूर्णपणे जाहीर केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. न्यायमूर्ती किशोर संत यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
डिजिटल पुराव्यांमुळे याचिकेला बळ
advertisement
महाराष्ट्रातील अनेक निवडणूक याचिका यापूर्वी फेटाळण्यात आल्या असल्या, तरी खताळ यांच्याविरोधातील याचिका न्यायालयाने स्वीकारली आहे. थोरात यांनी सरकारी जीएसटी संकेतस्थळावरील नोंदींचा आधार घेत डिजिटल पुरावे सादर केल्यामुळे या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
फर्ममधील भागीदारीवरून वाद
थोरात यांच्या याचिकेनुसार, खताळ हे ‘नीलकमल’ नावाच्या फर्ममध्ये भागीदार होते. या फर्मवर व्यावसायिक कराची थकबाकी असल्याचे जीएसटी नोंदींवरून दिसून येते. मात्र, खताळ यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात हा संबंध उघड केला नसल्याचा आरोप आहे.
उत्पन्न व थकबाकी लपवल्याचा दावा
फॉर्म 26 मध्ये खताळ यांनी सरकारी देयकांबाबत ‘शून्य’ अशी नोंद केली होती. परंतु थोरात यांच्या मते, संबंधित फर्मवर सुमारे २५ हजार रुपयांची थकबाकी असून व्याजासह ही रक्कम ५४ हजार रुपयांहून अधिक होते. त्यामुळे माहिती लपवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
खताळांचा बचाव फेटाळला
खताळ यांनी याचिका फेटाळण्यासाठी अर्ज करताना आपण सध्या त्या फर्मचे भागीदार नसल्याचा आणि फर्म विसर्जित झाल्याचा दावा केला. मात्र, थोरात यांनी जीएसटी संकेतस्थळावरील नोंदी सादर करून फर्म सक्रिय असल्याचे दाखवले. न्यायालयाने या टप्प्यावर खताळ यांचा बचाव ग्राह्य धरता येणार नसल्याचे स्पष्ट केले.
न्यायालयाचे निरीक्षण महत्त्वाचे
औरंगाबाद खंडपीठाने निरीक्षण नोंदवताना लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 100 (1) (B) अंतर्गत बाबी लागू होऊ शकतात, असे नमूद केले. त्यामुळे पुढील सुनावणीमध्ये या प्रकरणाची दिशा ठरणार आहे.
थोरातांचा १० हजार मतांनी केला पराभव
संगमनेर मतदारसंघात झालेल्या विधानसभा निवडणुकीत अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला होता. चार दशकांहून अधिक काळ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या थोरात यांना सुमारे १० हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. खताळ यांना १,११,४९५ मते मिळाली, तर थोरात यांना ९९,६४३ मते मिळाली होती.
