या मंदिराचा दैनंदिन दिनक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि अखंड सुरू आहे. दररोज पहाटे चार वाजता हनुमानाचा अभिषेक केला जातो आणि त्यानंतर आरती होते. हा नित्यक्रम वर्षानुवर्षे कोणत्याही खंडाविना सुरू असल्याचे मंदिराचे अध्यक्ष श्यामरावजी लढ्ढा यांनी सांगितले. 365 दिवस हा नियम काटेकोरपणे पाळला जातो, हीच या ठिकाणाची खास ओळख आहे.
वनवासी रामाची एकाच दगडातून घडवलेली मूर्ती, महाराष्ट्रातील हे ठिकाण माहितीये का?
advertisement
चांगापूर गावाचा इतिहासही तितकाच रोचक आहे. पूर्वी हे गाव वस्तीने समृद्ध होते, मात्र कालांतराने गाव उजाड झाले. तरीसुद्धा कडुलिंबाच्या झाडाखाली असलेली स्वयंभू हनुमंताची मूर्ती तिथेच स्थित राहिली. नंतर वलगाव येथील श्री वल्लभ बद्रीनाथ लढ्ढा यांना स्वप्नात हनुमंताने दृष्टांत दिला आणि त्यांनी 1935 साली मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे सांगितले जाते.
सुरुवातीला लहान असलेले मंदिर आता भव्य स्वरूपात उभे राहिले आहे. तेव्हापासूनच या ठिकाणी भक्तांची वर्दळ वाढू लागली. विशेषतः प्रत्येक शनिवारी येथे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. शनिवारी मंदिर परिसरात मोठी गर्दी उसळते. अनेक भक्त आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून येथे नवस करतात आणि पूर्ण झाल्यावर दर्शनासाठी येतात.
राजवाड्यासारखी विहीर
मंदिर परिसरातील प्राचीन विहीर हे या ठिकाणाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. या विहिरीची रचना इतकी सुंदर आहे की, ती पाहताना एखाद्या राजवाड्याचा भास होतो. विहिरीच्या सभोवताल भक्कम आणि आकर्षक बांधकाम केलेले आहे. त्याच परिसरात भगवान शंकराचे मंदिरही आहे, ज्यामुळे या स्थळाचे धार्मिक महत्त्व अधिकच वाढते.
प्रदक्षिणा मारल्यास मनोकामना पूर्ण
स्थानिकांच्या मते, या विहिरीभोवती 108 प्रदक्षिणा मारल्यास मनोकामना पूर्ण होते. अनेकांनी याचा अनुभव घेतल्याचे सांगितले जाते. आजही भाविक हातात नारळ घेऊन विहिरीची प्रदक्षिणा करतात आणि नंतर तो नारळ हनुमंताला अर्पण करतात. ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे.
विहिरीच्या आत एक गूढ गुफा असल्याचे सांगितले जाते. त्या गुफेमध्येही एक मंदिर आहे, मात्र सध्या ते बंद करण्यात आले आहे. तरीही या गोष्टीमुळे या स्थळाबद्दलची उत्सुकता आणि श्रद्धा अधिक वाढते.
मंदिराचे असेही वैशिष्ट्य
या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे समाजोपयोगी उपक्रम होय. श्री वल्लभ बद्रीनाथ लढ्ढा यांनी गोरगरिबांचा विचार करून येथे लग्नसमारंभासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. अत्यंत कमी खर्चात परिसर उपलब्ध करून दिला जातो, ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा दिलासा मिळतो. याशिवाय, येथे महाप्रसादाची सुविधाही उपलब्ध आहे. अनेक भाविक येथे येऊन महाप्रसादाचे आयोजन करतात. विशेष म्हणजे, महाप्रसादासाठी लागणारी भांडी मोफत दिली जातात, हीदेखील एक मोठी सोय आहे.





