Ram Navami 2026 : वनवासी रामाची एकाच दगडातून घडवलेली मूर्ती, महाराष्ट्रातील हे ठिकाण माहितीये का?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
प्रभू श्रीरामाच्या मूर्ती अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. पण अमरावतीतील तपोवनात उभी असलेली वनवासी रामाची मूर्ती मात्र सर्वसामान्य प्रतिमेपेक्षा वेगळी आणि लक्षवेधी ठरते. वनवासी वेश, धनुष्यबाण घेऊन सज्ज अवस्थेतील श्रीरामाचं हे रूप महाराष्ट्रात दुर्मिळ मानलं जातं.
अमरावती : प्रभू श्रीरामाच्या मूर्ती अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. पण अमरावतीतील तपोवनात उभी असलेली वनवासी रामाची मूर्ती मात्र सर्वसामान्य प्रतिमेपेक्षा वेगळी आणि लक्षवेधी ठरते. वनवासी वेश, धनुष्यबाण घेऊन सज्ज अवस्थेतील श्रीरामाचं हे रूप महाराष्ट्रात दुर्मिळ मानलं जातं. विदर्भ महारोगी सेवा मंडळाच्या तपोवनात ही मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी आयुष्य वाहिलेल्या पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी या ठिकाणाची उभारणी केली. 1956 साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या हस्ते या वनवासी रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 1957 मध्ये तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी या मूर्तीचं उद्घाटन केलं.
advertisement
मूर्तीची वैशिष्ट्ये काय आहेत?
या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे तिचं रूप. पारंपरिक प्रतिमेपेक्षा भिन्न, वनात वावरणाऱ्या योद्ध्याच्या रूपात श्रीराम येथे दिसतात. पिळदार शरीर, डाव्या हातात धनुष्य आणि उजव्या हातात बाण, जणू अन्यायाविरुद्ध सज्ज असलेला योद्धाच. त्यामुळे ही मूर्ती केवळ धार्मिक नाही, तर संघर्ष आणि धैर्याचं प्रतीक ठरते.
एकाच दगडातून घडलेली कलाकृती
दाट झाडांच्या सान्निध्यात शांत परिसरात उभी असलेली ही मूर्ती एकाच दगडातून कोरलेली आहे. इंगळे या मूर्तिकाराने ही मूर्ती साकारली असल्याची नोंद आहे. जरी त्यांची सविस्तर माहिती उपलब्ध नसली, तरी त्यांच्या हातून घडलेली ही कलाकृती आजही भाविकांचं लक्ष वेधून घेते.
advertisement
तपोवन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष गवई सांगतात की, तपोवन ही संस्था केवळ उपचारांची जागा नाही, तर सन्मानाने जगण्याचा हक्क देणारी जागा आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मांडलेल्या रामराज्य संकल्पनेची झलक येथे पाहायला मिळते. समाजाने नाकारलेल्या कुष्ठरुग्णांना येथे आधार, निवारा आणि स्वाभिमान मिळतो. श्रीरामाच्या जीवनातील मूल्यं न्याय, कर्तव्य आणि सर्वसमावेशकता याच विचारांवर तपोवन उभं आहे.
advertisement
गोशाळा आणि निवासस्थानांच्या मध्यभागी असलेली ही मूर्ती तपोवनातील रुग्णांसाठी प्रेरणास्थान आहे. अडचणींवर मात करण्याची ताकद, नव्याने उभं राहण्याची ऊर्जा हे सर्व या मूर्तीमधून मिळत असल्याची भावना अनेक जण व्यक्त करतात.
आजही तपोवनात या वारशाचं जतन केलं जात असून, भविष्यात या परिसराचा विकास करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ‘वनवासी राम’चं हे अनोखं दर्शन आणि त्यामागचा सामाजिक संदेश अनुभवण्यासाठी अमरावतीतील तपोवनाला भेट देण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
advertisement
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Mar 25, 2026 6:51 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
Ram Navami 2026 : वनवासी रामाची एकाच दगडातून घडवलेली मूर्ती, महाराष्ट्रातील हे ठिकाण माहितीये का?









