सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विजयाचे खाते उघडले आहे. मंत्री नितेश राणे यांच्या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाल्यानंतर मभाजप उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.
कणकवली तहसील कार्यालयामध्ये अर्ज छाननी सुरू असून यामध्ये बिडवाडी पंचायत समिती गणातील ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार विद्या शिंदे यांचा अर्ज अवैध ठरला आहे. विद्या शिंदे यांना 2014 नंतर तीन अपत्ये झाली असल्याबाबत भाजपचे उमेदवार संजना राणे यांनी आपल्या वकिलांमार्फत हरकत घेतली होती.
advertisement
त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विद्या शिंदे यांचा अर्ज अवैध ठरवला. अर्थातच बिडवाडी पंचायत समिती गणातून भाजपच्या संजना राणे बिनविरोध विजयी झाल्या आहेत. संजना राणे यांच्या बिनविरोध विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.
छाननीत अर्ज बाद कसा झाला?
जानवली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जानवली व बिडवाडी मतदारसंघातील उमेदवारांची छाननी दुपारी साडे अकरा वाजता सुरू झाली. यावेळी बिडवाडी मतदारसंघातील ठाकरे गटाच्या उमेदवार विद्या शिंदे यांच्या उमेदवारीवर भाजपच्या उमेदवार संजना राणे यांनी अधिकृत हरकत दाखल केली. भाजपच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर सविस्तर बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमानुसार १२ सप्टेंबर २००१ नंतर तीन अपत्ये असलेली व्यक्ती जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य होऊ शकत नाही. विद्या शिंदे यांना तीन अपत्ये असल्याचे त्यांच्या अपत्यांच्या जन्मनोंदी, आधार कार्ड तसेच इतर अधिकृत कागदपत्रांच्या आधारे सिद्ध करण्यात आले. याशिवाय, विद्या शिंदे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये अनेक त्रुटी व विसंगती असल्याचेही भाजपच्या वतीने निदर्शनास आणून देण्यात आले. सर्व पुरावे, कागदपत्रे आणि कायदेशीर बाबींचा सखोल विचार केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विद्या शिंदे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची माहिती ॲड. उमेश सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
