कोमल गवई असं मृत पावलेल्या २५ वर्षीय विवाहितेचं नाव आहे. तर प्रमोद सुरेश गवई (वय-३२) असं जवानाचं नाव आहे. ते बुलाढणाच्या राहेरी बुद्रुक येथील रहिवासी आहेत. ते भारतीय सैन्यात जवान असून अलीकडेच ते सुट्टीवर घरी आले आहेत. घटनेच्या दिवशी ते आपली पत्नी कोमल गवई आणि लहान मुलासह बुलेटने सासरवाडी लोणार येथे जात होते.
advertisement
नेमका अपघात कसा झाला?
तिघेही बुलेटने सिंदखेड राजा रस्त्यावरून जात असताना एका अज्ञात बैलगाडीला त्यांच्या दुचाकीचा अचानक धक्का लागला. यामुळे मोटरसायकल अचानक थांबली आणि पाठीमागे बसलेल्या कोमल गवई या रस्त्यावर पडल्या. त्याच वेळी, समोरून जालन्याकडे जाणारा भरधाव ट्रक त्यांच्या अंगावरून गेला. या भीषण अपघातात कोमल गवई यांचा जागीच चिरडून मृत्यू झाला.
या अपघातात पती प्रमोद गवई आणि त्यांचा लहान चिमुकला मुलगा हे दोघेही सुखरूप बचावले आहेत, परंतु पत्नीच्या मृत्यूमुळे गवई कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पोलीस स्टेशनचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी सिंदखेड राजा येथील रुग्णालयात पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पण सुट्टीवर आलेल्या जवानाच्या पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
