या पॅनलला काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब शेळके यांचा पाठिंबा मिळाला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्व नेते बाजार समितीच्या हितासाठी एकत्र आले आहेत, असा दावा भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केला आहे.
देशमुख यांच्याकडून मात्र स्वतंत्र लढाई लढण्याचे संकेत
advertisement
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडून मात्र स्वतंत्र लढाई लढण्याचे संकेत मिळाले आहेत. तसेच भाजपचेच दुसरे आमदार विजयकुमार देशमुख यांना देखील सचिन कल्याणशेट्टी यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
मागील निवडणुकीतही विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला काँग्रेसचे दिलीप माने यांनी पाठिंबा दिला होता, तर सुभाष देशमुख हे विरोधी पॅनल घेऊन मैदानात उतरले होते. त्यामुळे यंदाही देशमुख स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता आहे.
काँग्रेस भाजप युतीवर भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले...
या संदर्भात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले की, "आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवतोय. यात कोणताही पक्षीय राजकारणाचा मुद्दा नाही. दोन्ही देशमुख आमचेच नेते आहेत, त्यांना देखील सोबत येण्याचे आवाहन आम्ही केले आहे. इतके उमेदवार अर्ज दाखल करत असल्याने निवडणूक बिनविरोध होणे कठीण आहे, तरी आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करतो आहोत."
त्यावर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की "मुख्यमंत्र्यांनी सचिनदादांना सूचना केल्या, त्यांनी आम्हाला आवाहन केले आणि आम्हीही ते मान्य केले आहे. बाजार समितीचे हित हेच आमचे लक्ष्य आहे. सहकार क्षेत्रात मी स्वतंत्र निर्णय घेत असतो. मी स्वयंभू आहे."