प्रीतम पंडित, प्रतिनिधी, सोलापूर : भक्तीच्या ओढीने अक्कलकोटच्या दिशेने निघालेल्या भाविकांवर वाटेतच काळाने झडप घातली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवडी पाटीजवळ शनिवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. भरधाव अर्टिका कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने ५ मित्रांचा जागीच अंत झाला, तर एक महिला या अपघातातून थोडक्यात बचावली आहे
advertisement
नेमकं काय घडलं?
रायगड जिल्ह्यातील पनवेल येथून सहा मित्र मिळून अर्टिका कारने (क्र. MH-46 Z 4536) स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला निघाले होते. रात्री ११:३० च्या सुमारास गाडी देवडी पाटीजवळ आली असता, चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. वेग जास्त असल्याने कार रस्त्यापासून तब्बल १० ते १५ फूट लांब जाऊन एका मोठ्या झाडावर जोरात आदळली.
अपघाताची भीषणता पाहून पोलीसही हादरले हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला असून मृतदेह गाडीच्या पत्र्यांमध्ये पूर्णतः अडकले होते. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढताना पोलिसांनाही प्रचंड कसरत करावी लागली.
एक महिला बचावली, ५ मित्रांचा अंत
या दुर्दैवी घटनेत ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये ३ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. ज्योती जयदास टाकले (वय ३७ वर्ष, सेक्टर ७, पनवेल) या महिला प्रवासी या अपघातात जखमी झाल्या असून, सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मित्रांसोबत देवदर्शनाला जाऊन आनंदाने घरी परतण्याचे स्वप्न या भीषण अपघातामुळे अधुरेच राहिले. या घटनेमुळे पनवेल परिसरात आणि मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
>> अपघातातील मृतांची नावे
१) माला रवी साळवे, वय 40 वर्षे , पंचशील नगर झोपडपट्टी सेक्टर नंबर 18 न्यू पनवेल
२) अर्चना तुकाराम भंडारे, वय 47 वर्षे, सेक्टर 7 खांदा कॉलनी पनवेल वेस्ट
३) विशाल नरेंद्र भोसले वय 41 वर्षे, आरबीआय एमएसओ रूम नंबर 8, रेल्वे कॉलनी पनवेल स्टेशन जवळ पनवेल
४) अमर पाटील ,खारघर
५) आनंद माळी
