मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडला. मृत तिन्ही तरुण एकाच दुचाकीवरून जात होते. रूपाभवानी मंदिर परिसरातून जात असताना एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले आणि वाहनचालक तिथून पसार झाला. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ कमी होती, मात्र अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले.
नागेच गवंडी, रोहन पोरे, बसवराज चनशेट्टी असं मृत तरुणांची नावं असल्याची माहिती मिळाली आहे. हे तिन्ही तरुण ऐन उमेदीच्या वयातील असल्याने त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे गवंडी, पोरे आणि चनशेट्टी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले असून सध्या घटनेचा पंचनामा सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. हिट अँड रनचा हा प्रकार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
