अपमानास्पद वागणूक अन् हरिष नैराश्यात गेला
मिळालेल्या माहितीनुसार, हरिषचे एका तरुणीवर प्रेम होते. त्याच्या कुटुंबीयांनी त्या मुलीच्या घरी जाऊन लग्नाची मागणीही घातली होती, मात्र मुलीच्या वडिलांनी त्यांना दाद दिली नाही. उलट अपमानास्पद वागणूक दिल्याने हरिष प्रचंड नैराश्यात गेला होता. बुधवारी तो घराबाहेर पडला आणि त्यानंतर त्याचा मोबाईल बंद लागल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली होती.
advertisement
लॉजमध्ये 120 क्रमांकाची रूम
हरिषने जुना पुणे नाका येथील लॉजमध्ये 120 क्रमांकाची रूम भाड्याने घेतली होती. शनिवारी त्या रूममधून अचानक दुर्गंधी येऊ लागल्याने लॉज प्रशासनाने तातडीने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी दरवाजा उघडून पाहिले असता, हरिषने पंख्याला कापडाच्या साह्याने गळफास घेतल्याचे धक्कादायक दृश्य समोर आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो हॉस्पिटलमध्ये हलवला.
आईने हंबरडा फोडला
शासकीय रुग्णालयात मुलाचा मृतदेह पाहताच त्याच्या आईने मोठा हंबरडा फोडला. माध्यमांशी बोलताना त्यांनी आरोप केला की, "माझा मुलगा फक्त त्या मुलीला भेटण्यासाठी तडफडत होता, पण तिच्या पालकांनी त्याला भेटू दिले नाही." मुलीच्या आई-वडिलांच्या आडमुठेपणामुळेच हरिषने आत्महत्या केल्याचा दावा त्याच्या पालकांनी केला असून या मृत्यूला त्यांनाच जबाबदार धरले आहे.
सीसीटीव्हीची तपासणी
दरम्यान, या घटनेमुळे सोलापूरमधील नीलम नगर परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली आहे. प्रेमात मिळालेल्या नकारातून तरुणाने उचललेले हे पाऊल समाजासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून लॉजमधील सीसीटीव्ही (CCTV) आणि हरिषच्या मोबाईलची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे.
