सीडीआर मिळवणं अपेक्षित
अॅड. प्रशांत नवगिरे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात असे म्हटले आहे की, ज्या मोबाईल क्रमांकांचे सीडीआर मिळणे अपेक्षित होते, ते अद्याप पूर्णपणे मिळालेले नाहीत. या माहितीच्या अभावामुळे तपासाच्या प्रक्रियेत अडथळे येत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे संबंधित यंत्रणा आणि नोडल अधिकारी यांना तातडीने नोटीस काढून ही माहिती मागवण्यात यावी, अशी आग्रही विनंती त्यांनी केली आहे.
advertisement
सीडीआर आणि टॉवर लोकेशन
या संदर्भात 23 जानेवारी रोजी जिल्हा न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीदरम्यान सरकार पक्षाकडूनही आपली बाजू मांडली जाण्याची शक्यता आहे. सीडीआर आणि टॉवर लोकेशनचा अहवाल मिळाल्यास घटनेच्या वेळी संबंधित व्यक्ती नेमक्या कुठे होत्या, हे स्पष्ट होऊ शकणार आहे. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
7 जण कोण?
डॉ. शिरीष वळसंगकर यांचे चिरंजीव अश्विन वळसंगकर यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता, मात्र संशयित आरोपींच्या बाजूने आता 7 जणांच्या मोबाईल रेकॉर्डची मागणी केल्यामुळे प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे. हे 7 जण कोण आहेत आणि त्यांचा या घटनेशी काय संबंध आहे, हे न्यायालयातील सुनावणीनंतर अधिक स्पष्ट होईल.
तपास तांत्रिक पुराव्यांच्या दिशेने
दरम्यान, डॉ. वळसंगकर यांच्या निधनाने सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाचा तपास तांत्रिक पुराव्यांच्या दिशेने सरकत आहे. न्यायालय आजच्या सुनावणीत नोडल अधिकाऱ्यांबाबत काय निर्णय घेते, यावर तपासाची पुढील दिशा अवलंबून असणार आहे. या आत्महत्येमागील नेमकं कारण आणि जबाबदार व्यक्तींना शोधण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
