मनस्वी गोईलकर यांनी सांगितले की, त्या गेल्या अनेक वर्षांपासून LGBTQ समुदायासाठी काम करत आहेत. हा समुदाय स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असून, समाजातील अडचणींना तोंड देत अनेकजण नोकरी किंवा व्यवसाय करत आहेत. तसेच त्यांच्या समुदायातील अनेक सदस्य समाजातील वंचित घटकांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र ट्रान्सजेंडर समुदायाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अद्याप पूर्णपणे बदललेला नाही. हाच दृष्टिकोन बदलण्यासाठी मनस्वी गोईलकर यांनी समाजातील वंचित घटकांसाठी 100 दिवस मदत करण्याचा संकल्प केला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा संकल्प त्या पूर्ण करत आहेत. या संकल्पाच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत समाजातील अनेक वंचित घटकांना मदत केली आहे.
advertisement
नेमका काय आहे संकल्प?
मनस्वी गोईलकर या सलग 100 दिवस विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत. यामध्ये शाळकरी मुलांना कपडे व शैक्षणिक साहित्य देणे, रस्त्यावर राहणाऱ्या व्यक्तींना ब्लँकेटचे वाटप करणे, तसेच गरजू आणि गोरगरीब कुटुंबांना अत्यावश्यक वस्तू उपलब्ध करून देणे यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. या माध्यमातून त्या समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचण्याचा आणि आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच ट्रान्सजेंडर समाजाविषयी असणारा चुकीचा गैरसमज दूर करण्याचा देखील प्रयत्न मनस्वी करत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.





