कासेगावातील उळे गावात राहणारा हरिदास हा अकरावीत शिक्षण घेत होता. रविवारी गावाची जत्रा असल्याने तो आनंदात होता. मात्र शेतातील पिकांना पाणी देणे आवश्यक असल्याने त्याच्या वडिलांनी पाणी देऊन जत्रेला जा असे सांगितले. यात्रेच्या दिवशीच शेतात का जावे, यावरून हरिदास नाराज झाला. रागाच्या भरात तो मित्राच्या गाडीवरून शेतात गेला.
त्याचा राग पाहून कुटुंबीयांना शंका आली. त्यामुळे वडिलांनी त्याच्या भावाला पाठवले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये हरिदासने दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे भीषण दृश्य समोर आले. त्याला तत्काळ खाली उतरवून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
advertisement
हरिदास हा केवळ एक विद्यार्थी नव्हता, तर तो कासेगावचा अभिमान होता, गावाला भविष्यातील महाराष्ट्र केसरी दिसत होता. नुकत्याच झालेल्या शालेय कुस्ती स्पर्धेत 62 किलो वजनी गटात त्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरावर झेप घेतली होती. जिद्द, मेहनत आणि लाल मातीशी असलेली नाळ हीच त्याची ओळख होती. अकरावीत शिकणाऱ्या या मुलाने कुस्तीच्या आखाड्यात अनेक डावपेच जिंकले, अशा होतकरू मुलाच्या अकाली जाण्याने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.






