नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सर्जेराव नायकुडे हे बार्शीत आपल्या कुटुंबासह राहत होते. मात्र, गेल्या काही काळापासून घरात कौटुंबिक वाद वाढले होते. सून आणि सासरे सर्जेराव यांच्यात खटके वाढले होते. त्यातच सुनेकडून त्यांना वारंवार मानसिक त्रास दिला जात असे. साध्या साध्या गोष्टींवरून त्यांचा अपमान करणे, त्यांना टोमणे मारणे आणि सर्वात भयानक म्हणजे "तुला घरातून हाकलून देईन" अशी धमकी देणे, यामुळे सर्जेराव प्रचंड मानसिक तणावाखाली होते.
advertisement
सन्मानाने जगण्यासाठी टोकाचा निर्णय...
१० मार्च रोजी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. घराचा आधारवड असलेल्या सासऱ्याने सुनेच्या रोजच्या धमकावण्याला आणि अपमानाला कंटाळून विषारी औषध प्राशन केले. त्यांना तातडीने वाचवण्याचे प्रयत्न झाले, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. ज्या घरात त्यांनी रक्ताचे पाणी करून आयुष्य काढले, त्याच घरात त्यांना जगणे नकोसे झाले, हे ऐकून बार्शीकरांचे डोळे पाणावले आहेत.
या प्रकरणी मुलगा महेश नायकुडे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.
