अपघातात चार तरुणांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, काटली गावातील सहा तरुण दररोजप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉक आणि व्यायाम करण्यासाठी गेले होते. काटलीच्या नाल्याजवळ हे तरुण रस्त्याच्या कडेला बसले असताना भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
इतर चार तरुणांना तातडीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यापैकी आणखी दोन तरुणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातात मृतांची संख्या चार झाली आहे.
advertisement
दोन जखमींवर नागपुरात उपचार सुरू
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन तरुणांना पुढील उपचारांसाठी गडचिरोली पोलिसांच्या हेलिकॉप्टरने नागपूर येथे हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
या घटनेची माहिती मिळताच काटली गावातील नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी घटनास्थळी एकत्र येऊन रास्ता रोको सुरू केला. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, अज्ञात ट्रक चालकाचा शोध सुरू आहे.
अपघाताची ही घटना समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांना मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. त्याच बरोबर जखमी मुलांच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार करेल, असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं.