राज्यभर दहावी परीक्षेचा निकाल लागला. या निकालात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी मोठा आनंद साजरा केला. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातल्या वढोली या छोट्या गावात कलगटवार कुटुंबात एकाच वेळी दहावीला असलेल्या वडील आणि मुलापैकी मुलगा नापास तर वडील पास असा निकाल लागल्याने आनंद व्यक्त करावा की दुःख अशी स्थिती निर्माण झाली.
1997 साली राहिलेले विषय आत्ता सोडवले
advertisement
अनिल कलगटवार अल्पशिक्षित होते. त्यांना दोन मुले आहेत. त्यापैकी मोठा अमित हा उत्तम शिक्षण घेऊन अग्नीवीर प्रशिक्षण प्राप्त करत सध्या मध्य प्रदेशात देशसेवा करत आहे. तर दुसरा लहान मुलगा प्रिन्स यंदा दहावीत होता. त्याला अभ्यास कर, यावर लेक्चर देतानाच मुलाने मात्र तुम्ही दहावी झाला नाहीत आणि आम्हाला अभ्यास करायला सांगतात असे उत्तर दिले. यावर जिद्द मनात बाळगत 1997 साली दहावीत दोन विषय राहिलेल्या अनिल यांनी यंदा दहावी उत्तीर्ण करण्याचा निर्धार केला.
वडिल करायचे भंगारचा व्यवसाय
कुटुंब चालविण्यासाठी कलगटवार भंगार खरेदी- विक्रीचा व्यवसाय करतात. व्यवसाय- कुटुंब सांभाळून त्यांनी अभ्यासात लक्ष दिले आणि यंदा त्यांचा दहावी पासचा निकाल आला. मात्र त्याच वेळेस त्यांचा मुलगा प्रिन्स मात्र अपयशी ठरला. आता पुरवणी परीक्षेत आपण प्रिन्सच्या राहिलेल्या पेपरवर लक्ष केंद्रित करून दहावी उत्तीर्ण करण्यासाठी मदत करणार असल्याचे कलगटवार सांगतात.