मिळालेल्या माहितीनुसार ही घटना वसईच्या श्री हनुमंत विद्यामंदिर हायस्कूलमध्ये घडली. इथं एका शिक्षिकेने १२ वर्षीय विद्यार्थिनीला पाठीवर दप्तरासह १०० उठाबशा काढण्याची अमानुष शिक्षा सुनावली. या क्रूर शिक्षेमुळे विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान बालदिनीच (१४ नोव्हेंबर) तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली असून मनसेसह विविध राजकीय संघटनांनी शाळा प्रशासन आणि दोषी शिक्षिकेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
advertisement
१०० उठाबशांची अमानुष शिक्षा
वसईच्या श्री हनुमंत विद्यामंदिर हायस्कूलमध्ये इयत्ता ६ वीत शिकणारी काजल गोंड (१२) ही विद्यार्थिनी ८ नोव्हेंबर २०२५ रोजी शाळेत केवळ १० मिनिटं उशिरा पोहोचली. शाळेत उशिरा आल्याने शिक्षिकेने क्रौर्याचा कळस गाठत तिला पाठीवरील जड दप्तरासह १०० उठाबशा काढण्याची कठोर शिक्षा दिली.
कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार, ही अमानुष शिक्षा पूर्ण केल्यानंतर काजलच्या कंबर आणि पायांमध्ये तीव्र वेदना सुरू झाल्या. तिची प्रकृती झपाट्याने खालावत असल्याचं लक्षात येताच तिला तातडीने नालासोपारा येथील रुग्णालयात दाखल केलं. मात्र, प्रकृती अधिक चिंताजनक बनल्यामुळे तिला पुढील उपचारांसाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले. पण उपचारांदरम्यान काजलची प्राणज्योत मालवली.
खुनाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी
या गंभीर आणि संवेदनशील घटनेनंतर पालक आणि राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पालकांनी संबंधित शिक्षिका व शाळा व्यवस्थापनावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मनसेने तर दोषींवर एफआयआर दाखल होईपर्यंत शाळा पुन्हा सुरू करू देणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाला दिला आहे.
